भारतीय लोकजीवनात स्त्री पूजनाला अनन्यसाधारण महत्त्व असून तिचा सन्मान करणे तिला आदराने वागवणे ही आचार रीती भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारी आहे.श्रमाला प्रतिष्ठा देत परिवार आणि परिस्थितीला चांगलं वळण देणारी ती अद्वितीय योध्दा आहे. प्रेममयी,शांततापूर्ण मार्गाने मानवता केंद्रीत मनमंदिराची उभारणी करणारी संस्कारक्षम संस्कृती कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या शिक्षणातून विकसित होत असल्याचे प्रतिपादन वनामकृविचे कुलगुरू डॉ.इंद्र मणी यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या २४व्या दीक्षांत समारंभात मान्य झालेल्या पदव्यांचे वितरण मान्यवरांचे हस्ते कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी येथे करण्यात आले. अध्यक्षस्थानी नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव जामकर होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. वसंतराव भोसले, उपप्राचार्य डॉ.संगीता आवचार,परीक्षा विभाग प्रमुख निर्मला जाधव,प्रा.परमेश्वर यादव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.अरुण पडघन, आयक्यूएसी समन्वयक डॉ.ओमप्रभा लोहकरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.रविंद्र इंगळे, वाड्मय विभाग प्रमुख डॉ.आशा गीरी यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्राचार्य डॉ .वसंतराव भोसले यांनी केले. उपप्राचार्य डॉ.संगीता आवचार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शिक्षणातून सुंदर संस्कार होत माणूस विचारी बनतो.चांगल्या वाईटातील फरक कळू लागतो, असे कुलगुरू डॉ. मणी यावेळी म्हणाले. या वेळी कला शाखा ६२, वाणिज्य शाखा ४८, बीसीए शाखा०६,बी.व्होक १२, एम कॉम ३०, एमएस्सी सीएस ०४ पदवींचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.संगीता लोमटे यांनी केले तर आभार प्रा.डॉ.ओमप्रभा लोहकरे यांनी व्यक्त केले.