भोकर : तालुक्यातील मौ.पिंपळढव येथील शेतकरी पती पत्नी हे आपल्या शेतातील कापूस निंदनासाठी गेले असतांना दि.८ सप्टेंबर रोजी दुपारी अचानक सुरु झालेल्या पावसात विज पडल्याने ती शेतकरी महिला जागीच ठार झाली असून पती जखमी झाला आहे.तर या जखमी शेतकऱ्यास पुढील उपचारासाठी भोकर येथे आणण्यात आले असून या शेतकरी महिलेच्या आकस्मित मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मौ.पिंपळढव ता.भोकर येथील शेतकरी सुभाष पोले व त्यांच्या पत्नी सौ.ललिता सुभाष पोले(३८) हे दोघे दि.८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी गट नं.१७९ मधील त्यांच्या शेतातील कापूस निंदन करण्यासाठी गेले होते.दुपारी २:०० वाजताच्या दरम्यान हे दोघे जेवन करण्यासाठी शेतातील एका झाडाखाली बसले असतांना अचानक विज गर्जनेसह पाऊस सुरु झाला.यावेळी दुपारी २:२० वाजताच्या दरम्यान या पाऊसातील विज त्या झाडावर कोसळली व झाडाखाली असलेल्या या शेतकरी महिलेवर पडली.यात ती जागीच ठार झाली.तर शेतकरी सुभाष पोले हे जखमी झाले आहेत.या जखमी शेतकऱ्यास पुढील उपचारासाठी भोकर येथे आणण्यात आले आहे.घटनास्थळी पो.उप.नि.दिगांबर पाटील व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी,मंडळ अधिकारी सौ.सविता खुसळे व तलाठी नामदेव मुळेकर,पो.पा.शिलानंद गायकवाड हे पोहचले असून रितसर पंचनामा करणे सुरु आहे.सदरील शेतकऱ्यास ५ मुलीच असून तिघींचे विवाह झाले आहेत.तर शेती उत्पन्नावर आपल्या कुटूंबियांचा उदरनिर्वाह करणाऱ्या या शेतकरी महिलेचा आस्मानी आपत्तीत अशा प्रकारे आकस्मित दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.