बीड ः प्रतिनिधी

किडनी विकारग्रस्तांना डायलिसीसची आवश्यकता भासते. हे उपचार सातत्याने घ्यावे लागत असल्याने त्याचा खर्चही मोठा असतो. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या रुग्णांना या उपचारात अडचणी येत असल्याची जाणीव ठेवून रोटरीच्या वतीने डायलिसीसची सुविधा मोफ त उपलब्ध करण्यात आली आहे. शहरातील लाईफ लाईन हॉस्पिटल, नगर रोड येथे हे रोटरी डायलिसीस सेंटर कार्यान्वीत केले जाणार असून याचे लोकार्पण दि.10 रोजी मान्यवरांच्या हस्ते केले जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

रोटरी क्लब ऑफ बीडच्या वतीने बुधवारी बीडमध्ये आयोजीत पत्रकार परिषदेसे रोटरीचे माजी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर हरिष मोटवाणी, अध्यक्ष कल्याण कुलकर्णी, प्रोजेक्ट चेअरमन प्रा.सुनिल जोशी, वाय.जनार्धन राव, डॉ.संतोष शिंदे, संतोष पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

रोटरी डायलिसीस सेंटरचे दि.10 रोजी लोकार्पण होणार आहे. लाईफ लाईन हॉस्पिटल, नगर रोड या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मुख्य कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी 4 वाजता होणार आहे. यावेळी रोटरी इंटरनॅशनल डायरेक्टर पीडीजी डॉ.महेश कोटबागी, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, मुख्य कार्यकरी अधिकारी अजित पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गित्ते, द कुटे ग्रुपच्या मॅनेजिंग डायरेक्टर सौ.अर्चना सुरेश कुटे, डी.जी.रुकमेश जखोटिया, पीडीजी प्रमोद पारिख, पीडीजी हरिष मोटवानी, डॉ.अनुराग पांगरीकर, डॉ.संतोष शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रो.कल्याण कुलकर्णी, रो.मेघा गुप्ता, रो.मोईन शेख, रो.सतीश शिंगटे, रो.प्रा.सुनिल जोशी, रो.कॅ.मनोहर महाजन, रो.वाय.जनार्धन राव, रो.क्षितीज झावरे, रो. राजेश मुनोत, रो. विकास उमापुरकर यांनी केले आहे.

औरंगाबाद, पुण्याला जावे लागणार नाही

बीड जिल्ह्यामध्ये असणारी रुग्णसंख्या व उपलब्ध डायलिसिस मशीनची संख्या यामधील तफावत त्यामुळे बहुसंख्य रुग्णांना जवळपासच्या औरंगाबाद, लातूर, अहमदनगर अशा शहरांमध्ये जाऊन हा उपचार करावा लागतो. त्यामुळे आणखीनच आर्थिक भार वाढतो. हेच लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ बीड च्या माध्यमातून पाच अद्ययावत डायलिसिस मशीन असलेले रोटरी डायलिसिस सेंटर सुरू करण्यात येत आहे. यामध्ये गरजू व आर्थिक दृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी (पिवळे रेशन कार्ड धारकांना) प्रत्येक महिन्याला 200 डायलिसिस पूर्णतः मोफत करण्यात येणार आहेत. तसेच केशरी रेशनकार्ड असणार्या रुग्णांसाठी फक्त 900 रुपये व सफेद रेशनकार्ड असणार्या रुग्णांसाठी फक्त 1200 रुपये एवढ्या अल्पदरात डायलिसीस केले जाणार आहेत.