मेहकर :कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहनावरील ताबा सुटल्याने ऑटो रस्ता दुभाजकावर आदळून पलटी झाला. या अपघातात जबर मार लागल्याने एक ३७ वर्षीय विवाहीत महिला ठार तर यात सहा महिला जखमी झाल्या आहेत.
दिनांक ७ ऑगस्ट रोजी दुपारी ही घटना मेहकर जानेफळ रस्त्यावरील समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ दुपारी २.३० वाजता घडली. या संदर्भात वृत्त असे की, शहरापासून जवळ असलेल्या गवंढाळा येथून काही महिला
ऑटोने मेहकर कडे येत असताना, समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ
ऑटोच्या समोर अचानक कुत्रा आला. कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ऑटो चालकाचा वाहनावरील ताबा गेला व ऑटो रस्ता दुभाजकावर आदळल्याने पलटी झाला. या अपघातात ज्योती ओंकार पडघान वय ३७ रा. गवंढाळा ही महिला ठार झाली.तर सुनिता सदानंद खरात, कौशल्य राजू खरात, वनिता समाधान पडघान, जयश्री सतीश खरात, मंगला गजानन खरात व सुषमा नंदकिशोर जाधव या जखमी आहेत. वृत्त लिहीपर्यंत चालकावर गुन्हा दाखल झाला नव्हता.