तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातील शेतकरी नेते माणिकराव कदम यांच्यावर तेलंगणा विकासाच्या मॉडेलच्या प्रचार, प्रसाराची जबाबदारी सोपवली आहे. या अनुषंगाने माणिक कदम यांनी आज बुधवारी (दि.7) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नितीन सावंत, स्वराज्य इंडियाचे जिल्हाध्यक्ष गोविंद गिरी, नारायण जवकर, ज्ञानोबा शेवाळे यांची उपस्थिती होती. तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर राव यांंच्यासमवेत कदम यांनी केलेल्या तेलंगणा व बिहार दौर्‍याबद्दल माहिती यावेळी देण्यात आली. कदम म्हणाले की, येत्या काळामध्ये परभणी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात नव्याने शेतकरी धोरण जे की तेलंगणामध्ये यशस्वी ठरत आहे त्यासाठी शेतकरी चळवळ नव्याने उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. याची की जबाबदारी माणिक कदम यांच्यावर देण्यात आल्याचे सांगण्यात आले. तेलंगणा राज्यात रयतू बंधू योजना, सर्व शेतकर्‍यांना मोफत वीज, कामेश्वम प्रकल्पातून सिंचनासाठी मोफत मुबलक पाणी, 24 तास उत्तम दाबाने वीज उपलब्ध करुन दिली जाते. धरणी पोर्टलद्वारे शेतजमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार दलालांशिवाय पारदर्शकपणे व विना खर्च पार पाडले जातात. तलाठ्यांना इतर कार्यालयात सामावून घेत कुठल्याही अडचणीविना शेतकर्‍यांची सर्व कामे केली जातात. अशा प्रकारे संपूर्ण देशात शेतकर्‍यांसाठी तेलंगणा विकास मॉडेल लागू व्हायला पाहिजे, तरच शेतकरी आत्महत्या थांबतील असे कदम यांनी सांगितले. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी देशातील शेतकर्‍यांसाठी तळमळीने काम करणार्‍या नेते, कार्यकर्ते यांना एकत्र आणले असून लवकरच ते राष्ट्रीय पातळीवर शेतकरी संघटना स्थापन करणार असल्याची माहिती कदम यांनी यावेळी दिली.