५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील साखरा येथील जिल्हा परिषद शाळेचे सहायक शिक्षक राजू महल्ले, वाशिमच्या श्री. बाकलीवाल विद्यालयाचे कला शिक्षक अमोल काळे आणि वाशिमच्या राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती कुलकर्णी या शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) संजय जोल्हे, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, आकाश आहाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.   शिक्षक महल्ले यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतांना सध्याच्या कॉन्व्हेंट संस्कृतीमध्ये मातृभाषेतून/मराठीतून शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या व नगर परिषदेच्या शाळांना शासनाकडून बदलत्या काळानुसार काही प्रोत्साहनपर योजना सुरू करता येतील काय जेणेकरून मराठी भाषा समृद्ध होण्यास मदत होईल व ह्या शाळा टिकून राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली. बाकलीवाल विद्यालयाचे कला शिक्षक काळे हे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचेशी संवाद साधतांना म्हणाले, आजच्या युगात विद्यार्थी व पालकांचा विज्ञान व गणित या विषयाकडे मोठ्या प्रमाणात कल दिसून येतो. मात्र कला विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन उदासीन आहे. कला विषयाचे महत्व वाढविण्यासाठी काही उपाययोजना करण्यात याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.  श्रीमती कुळकर्णी संवाद साधतांना म्हणाल्या, ग्रामीण भागामध्ये विशेषतः आर्थिक परिस्थिती कमजोर असलेल्या पालकांमध्ये मुलींच्या शिक्षणाबाबतची उदासीनता दिसून येते. अशा कुटुंबातील मुलींच्या शिक्षणासाठी काही उपाययोजना करण्यात याव्यात असे त्यांनी सुचविले.   मुख्यमंत्री  शिंदे यांनी सर्वप्रथम सहभागी शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांशी संवाद साधण्याचा योग आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. शिक्षकांनी आजच्या संवादातून जे प्रश्न उपस्थित केले आणि ज्या अपेक्षा व्यक्त केल्या, त्या निश्चितपणे सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री  शिंदे यावेळी म्हणाले. शिंदे हे शिक्षकांशी संवाद साधतांना म्हणाले, प्राचीन काळापासून शिक्षकांबद्दल आदर आहे. आपल्या देशात राष्ट्रपती या सर्वोच्च पदावर पोहचलेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे सुध्दा पुर्वी शिक्षक होते. त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू हया सुध्दा पुर्वी शिक्षीका होत्या. यशस्वी जीवनात शिक्षकांचे स्थान आगळे वेगळे आहे. आई-वडीलांसह आपल्याला घडविण्यात शिक्षकांचा मोठा वाटा आहे. ज्ञानदानाची शिक्षकांची भूमिका आजही कायम असल्याचे ते म्हणाले.  महाराष्ट्र हे पुरोगामी आणि प्रयोगशील राज्य असल्याचे सांगून श्री. शिंदे म्हणाले, सावित्रीबाई फुलेंचा आदर्श आपल्या सर्वांपुढे आहे. राज्याने नवनविन शैक्षणिक प्रयोग केले आहे. ते प्रयोग देशाने सुध्दा स्विकारले आहे. राज्याने केंद्राच्या नविन शैक्षणिक धोरणाचा स्विकार करुन त्यादृष्टीने काम सुरु केले आहे. विद्यार्थी केंद्रीत विचार या शैक्षणिक धोरणात आहे. शिक्षण हे समाज निर्मित्ती करणारे क्षेत्र आहे. ज्ञानाची क्षितीजे दिवसेंदिवस विस्तारत आहे. कोरोनाचा काळ शिक्षणासाठी चिंताजनक होता. फळयाची जागा मोबाईलने घेतली. त्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण देण्यात आले. हे ऑनलाईन शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षकांनी आव्हान म्हणून स्विकारली आणि ती पुर्ण देखील केली. शिक्षणातून समाज घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे. शाळांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरु केली असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.    वाशिम येथून मुख्यमंत्र्यांशी शिक्षक दिनानिमित्त आयोजित संवाद कार्यक्रमामध्ये मालेगांव तालुक्यातील घाटा येथील सहाय्यक शिक्षक संभाजी साळसुंदर, आमखेडा केंद्र शाळेच्या केंद्र प्रमुख इंदिरा राणे, मंगरुळपीर तालुक्यातील पोटी येथील सहाय्यक शिक्षक शरद सुरशे, पेडगांव येथील सहाय्यक शिक्षक सुनिल ठाकरे, रिसोड तालुक्यातील नावली येथील सहाय्यक शिक्षक नारायण गारडे, आसेगांव पेन येथील शैलेश मवाळ, मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील रणजीत जाधव, हिवरा येथील देविदास वानखेडे, कारंजा तालुक्यातील येवता बंदी येथील मित्रचंद वाटकर व कारंजा येथील प्रशांत गंधक आदी शिक्षक सहभागी झाले होते. 

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं