औरंगाबाद :५ स.(दीपक परेराव)शहरापेक्षा ग्रामीण भागातील शाळांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा पासून ते दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी सातत्याने झगडावे लागते. ग्रामीण भागातील शिक्षणाबाबतीत कागदावर एक आणि प्रत्यक्षात दुसरे चित्र असते. या सुविधा उभारताना शासनाला सुद्धा मर्यादा असतात हे लक्षात घेऊन गावातील लोकांनी लोकसहभागातून पुढची पिढी घडविण्याचे काम करावे. त्यासाठी कॉर्पोरेट कंपन्या, सामाजिक संस्था आणि व्यक्तींनी एकत्रित यावे, असे मत नभांगण फाउंडेशनची संस्थापक अध्यक्ष तथा अभिनेत्री राजश्री देशपांडे हिने व्यक्त केले. त्या पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत सोमवारी (ता. ५) बोलत होत्या.

पुढे बोलताना राजश्री म्हणाली की, आज शिक्षक दिनाच्या दिवशी ढोरकिन तांडा येथे गावातील राठोड दाम्पत्यानी दिलेल्या ३ हजार चौरस फुट जागेवर १७०० चौरस फुट बांधकाम करून दोन खोल्या, किचन, मोठे मैदान आणि स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. याठिकाणी ४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे गावातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होईल.

२०२० मध्ये पहिल्यांदा नभांगण फाऊंडेशनच्या पुढाकाराने सर्वात अगोदर पांढरी पिंपळगाव (ता. जि. औरंगाबाद) येथील पहिली ते सातवीची शाळा प्रायोगिक तत्वावर लोकसहभागातून पुनरुज्जीवन करण्यासाठी घेण्यात आली. याठिकाणी फाऊंडेशन ने यशस्वीरीत्या सहा खोल्या नव्याने बांधल्या, तर दोन खोल्यांचे पुनरुज्जीवन केले.

आज या ठिकाणी पंचक्रोशीतील ११० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या उभारणीसाठी 300 हून अधिक लोकांनी अगदी एक रुपयापासून पुढे हजारो रुपयांपर्यंत निधी दिला. आज याठिकाणी देश विदेशातून तज्ञ येऊन वेगवेगळ्या विषयावर कार्यशाळा घेत आहेत. त्याचप्रमाणे वर्ग खोल्यांसह क्रीडांगण, ग्रंथालय, स्वच्छतागृह आणि किचन उभारण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आंबी विलेज (जि. पुणे) येथील शाळेत दोन खोल्यांचे पुनरुज्जीवन आणि स्वच्छता गृह बांधण्यात आले. या रांगेत ढोरकिन तांडा येथील शाळेचाही समावेश झालाय.

ढोरकिन तांडा येथे नभांगण फाऊंडेशन, लोकसहभाग आणि क्लेवर टॅप कंपनीच्या सीएसआर निधीतून जिल्हा परिषदेच्या शाळेने नवीन आकार घेतलाय. यापूर्वी इथे तुटकी फुटकी एक खोली होती. त्या ठिकाणी शिक्षण घेणे तर सोडा पण दहा मिनिटे बसणेही अशक्य होते. या शाळेसाठी जागाही अपुरी होती. या शाळेसाठी गावातीलच उत्तम राठोड यांनी शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन 3000 चौरस फूट जागा देऊ केली. त्यामुळे पुढील प्रक्रिया होऊ शकली. आज या ठिकाणी सतराशे चौरस फूट जागेवर पक्के बांधकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी ४० विद्यार्थी शिक्षण घेत होती. हे सगळे विद्यार्थी ऊसतोड कामगार आणि वीट भट्टी कामगार यांची आहेत. त्यांना शिक्षणापेक्षा एक दिवसाचा रोजगार अति महत्त्वाचा असतो. ते त्यांच्या दृष्टीने योग्यही आहे.

सजग नागरिक या नात्याने पुढची पिढी घडवायची असेल, तर त्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. नभांगण फाउंडेशनच्या माध्यमातून तीन शाळा बदलण्यास यश मिळाले आहे. सामाजिक संस्था आणि व्यक्तींनी एकत्र येऊन काम केल्यास अगदी तांड्यापर्यंतच्या शाळा आणि शैक्षणिक दर्जा सुधारू शकतो, असेही राजश्री म्हणाली.

आज शिक्षक दिनानिमित्त या शिक्षकांचा सन्मानशिक्षक दिनानिमित्त नभांगण फाऊंडेशनतर्फे अलका झरवाल, मनीषा अकोलकर, प्रमोद कोकाटे, वरुण वाघमोडे, वैशाली पुर नाळे, ज्योत्सना झोटिंग आणि मंगला मदने या शिक्षकांचा ढोरकिन तांडा येथे सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, भाडिपाचे सारंग साठे आणि पॉला यांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे ढोरकिन तांडा येथील गावकऱ्यांचीही उपस्थिती होती.