भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा केला जात असताना येत्या 17 सप्टेंबर 2022 रोजी सुरू होणाऱ्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा मुक्ती संग्रामात महत्वपूर्ण योगदान दिलेल्या आठही जिल्ह्यातील हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी परभणीतील काकडे परिवाराने आपल्या घरी महालक्ष्मी समोर पोस्टर्सच्या माध्यमातून सजावट करुन लोकप्रबोधनाचा प्रयत्न केला आहे. गौराई अर्थातच महालक्ष्मीच्या आगमनाची आतुरता सागळ्यांनाच असते. जशी गणपतीच्या स्वागतास आतुरतात मनं अगदी त्याचप्रमाणे गौराईचं स्वागत करण्यासाठी महिलावर्गामध्ये कमालीचा उत्साह असतो. गौराईची अनेक रूपं मनात ठसतात. गौरी आवाहनाला गौरीचं घरोघरी होणारं आगमन गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करणारा ठरतो. गौरीपूजनाच्या वेळी केली जाणारी गौरीची आरास, सजावट, भरला जाणारा ओवसा, गौरीचा नैवेद्य, खेळल्या जाणार्‍या फुगड्या व गाणी पाहता गौराईच्या स्वागताला सगळ्यांच्याच आनंदाचे भरते येते. काही ठिकाणी गौरीचे मुखवटे, तर काही ठिकाणी उभ्या स्वरूपात गौरी, तर काही बैठ्या स्वरूपात गौरीची आरास केलेली दिसून येते. यावेळी गौरीला दागदागिने, नवी साडी, मुकूट, नथ, केसांत फुलांची वेणी, पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवला जातो. गणपतीच्या शेजारीच ही आरास केली जाते. यानिमित्ताने सामाजिक संदेश देणारे देखावे पाहण्यास मिळत आहेत. कोणी निसर्गाबद्दल आपले सामाजिक विचार मांडत आहे तर कोणी यासाठी सामाजिक संदेश देणारे देखावे साकारत आहेत. असाच आगळा वेगळा देखावा परभणी येथे कृषी सारथी कॉलनी भागातील रहिवासी क्रीडा शिक्षक तथा त्रिधारा येथील ओंकारेश्वर विद्या मंदिरचे मुख्याध्यापक रणजित काकडे यांच्‍या कुटुंबीयांनी दिला आहे. काकडे यांच्या घरी गौरी गणेशाचे आगमन झाले. त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या माहितीवर आधारीत गौरीची सजावट केली आहे. यासाठी कुटुंब प्रमुख तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलसचिव शिवाजीराव काकडे व त्यांच्या पत्नी शांताबाई यांच्या मार्गदर्शनाखाली कल्पना रणजीत काकडे, डॉ.अनिता संजय काकडे,रिता गजानन काकडे यांनी महालक्ष्मीची मांडणी व सजावट केली. त्यांना ऋषिकेश, ज्ञानेश्वरी, समर्थ, तन्मय, कार्तिकी, सान्वी या बच्चे कंपनीने मदत केली. काकडे परिवाराने 2019 मध्ये मतदार जागृती, 2021 मध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा देखावा साकारला होता. यंदाही देखावा पाहण्यासाठी त्यांच्या घरी नागरिक गर्दी करीत आहेत.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं