पात्रता असतानाही काही कंपन्या स्थानिकांना नोकरीपासून वंचित ठेवत आहेत. यामुळे बेरोजगार झालेल्या तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी दिवसरात्र काम करणार असल्याची ग्वाही अलिबाग-मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिली आहे. पुढील काही दिवसातच युवासेनेच्या माध्यमातून जिल्ह्यात रोजगार मेळावे घेतले जाणार असून मुलाखतीच्या ठिकाणीच नोकरीची शाश्वती या मेळाव्यातून येथील तरुणांना मिळणार आहे. या मेळाव्यांमध्ये विविध कंपन्यांचे अधिकारी, सरकारी अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
सध्या युवा सेनेचे सचिव अॅड. विराज म्हामुणकर यांचा कोकण दौरा सुरु आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक अलिबाग येथील राजमळा येथे शनिवार (ता.3) आयोजित करण्यात आली होती. अलिबाग-मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी, युवानेते अभिराजशेठ दळवी, रोहा तालुका प्रमुख अॅड. मनोज शिंदे, अजय गायकर, मनोज पाटील, संकेत नाईक, संकेत पाटील, संदेश थळे आदी उपस्थित होते. या बैठकीत संघटना बांधणीसाठी भर देताना गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. संघटना वाढीबरोबरच बेरोजगारांच्या समस्या सोडवण्यावरही विशेष भर देण्यात येणार असल्याचे आ. महेंद्र दळवी यांनी सांगितले. गणेशोत्सवानंतर नोकरी मेळावे, रोजगार मेळावे घेतले जाणार आहेत. यामध्ये विविध कंपन्यांचे अधिकारी, शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात शैक्षणिक पात्रता पुर्ण करणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असून याच ठिकाणी त्यांना नियुक्तीपत्रेही मिळण्याची शाश्वती आ. महेंद्र दळवी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिली.