वाघोलीत महापालिकेच्या वतीने गणेशमूर्ती विसर्जन व संकलनाची सोय
पाच ठिकाणी मूर्ती विसर्जन करता येणार ; वाघेश्वर मंदिर परिसरात यंत्रणा सज्ज
वाघोली येथे पाचव्या, सातव्या, नवव्या, दहाव्या दिवशी गणेशमूर्ती विसर्जनाची महापालिकेच्यावतीने पाच ठिकाणी सोय करण्यात आली आहे. वाघेश्वर मंदिर, वाघेश्वर उद्यान, बीजेएस कॉलेज, गणेशनगर, भैरवनाथ तळे याठिकाणी भाविकांना मूर्ती विसर्जन व संकलन सुविधा उपलब्ध असणार आहे. वाघेश्वर मंदिर परिसरामधील गणेश मूर्ती विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.
मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणेशोत्सवावर निर्बंध असताना यंदाच्या वर्षी वाघोली परिसरातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे. वाघोलीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह व घरगुती गणपतींचे विसर्जन प्रामुख्याने पाचव्या, सातव्या, नवव्या, दहाव्या दिवशी होत असल्यामुळे गणेश मूर्ती विसर्जन करताना नागरिकांना अडचणी येऊ नये म्हणून महानगरपालिकेच्यावतीने पाच ठिकाणी विसर्जन हौद व मूर्ती संकलनाची सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे निर्माल्य गोळा करण्याची सोय देखील केली आहे. विसर्जनासाठी बीजेएस कॉलेज (जिम्नशियम हॉल), गणेश नगर (प्रभू श्रीराम उद्यान), भैरवनाथ तळे, वाघेश्वर उद्यान, वाघेश्वर मंदिर याठिकाणी नागरिकांना गणेश मूर्तींचे विसर्जन व संकलन/दान करता येईल. विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिका नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी याठिकाणी तैनात असणार आहेत.
वाघोलीतील खाण परीसरात मुर्त्यांचे पुनर्विसर्जन
पुणे महापालिकेच्या वतीने वाघोली येथील खाण परिसरामध्ये मुर्त्यांचे पुनर्विसर्जन केले जाते. यावर्षी देखील संकलित करण्यात आलेल्या मुर्त्यांचे खाण परिसरामध्ये विसर्जन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गणेश मुर्त्यांचे सन्मानपूर्वक पुनर्विसर्जन व्हावे यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.