गावात स्मशानभूमी नाही; चक्क नदीकाठीवर करावे लागते अंत्यसंस्कार,
पाचोड(विजय चिडे) पैठण तालुक्यातील रजापूर येथे स्मशानभूमीच नसल्यामुळे गावातील मृतकांवर अंत्यसंस्कार करावे तरी कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला; परंतु गावात स्मशानभूमीच नसल्याने कुटुंबीयांवर महिलेच्या पार्थिवावर चक्क गावातील नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. त्यामुळे गावात लोकप्रतिनिधींविषयी रोष व्यक्त होत आहे.
रजापूर येथील 70 वर्षीय प्रयागबाई कडुबा नरवडे यांचे दि 31रोजी मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले, दि 1रोजी दुपारी त्याच्या पार्थिवावर गावात अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी, मोक्षधाम नाही. अशा परिस्थितीत महिलेवर अंत्यसंस्कार करावेत तरी कुठे, असा प्रश्न महिलेचे कुटुंबीय, नातेवाइकांना पडला. अखेर गावालगतच्या नदीजवळ काठा वरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. 1 सप्टेंबर रोजी दुपारी नातेवाईक, कुटुंबीयांनी अत्यंत जड अंत:करणाने गावातील नदीच्या काठावर महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. हे अंत्यसंस्काराचे विदारक चित्र पाहून, रस्त्यावरील वाहनचालकसुद्धा अचंबित झाले होते.
मरतानासुद्धा मरणे सोपे नाही. मरणानंतरही माणसाला यातना सहन कराव्या लागतात. याचेच उदाहरण गुरुवारी रजापूर येथे पाहायला मिळाले. ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे मृतकाला स्मशानभूमीसुद्धा नशीब होत नाही, यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते?
चौकट :---
गावाला स्म्शानभूमी बांधून द्या, मृत्युंनंतर होणारी विटंबना थांबवा.
रजापूर गावात स्मशानभूमी नसल्यामुळे ग्रामस्थांना उघड्यावर, रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता तरी लोकप्रतिनिधींनी जागे व्हावे आणि स्मशानभूमी, रजापूर गावाला उपलब्ध करून द्यावी, आणि मृत्युंनंतर होणारी विटंबना थांबवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे,
फोटो कॅप्शन :--रजापूर येथे स्मशान भूमी नसल्याने असे नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करावे लागते.
(छायाचित्रे-विजय चिडे,पाचोड)