सोलापूर - महाराष्ट्रातील मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथे पाच हजार वर्षांपूर्वीचे महादेवाचे अतिशय पुरातन मंदिर आहे. शुक्राचार्य, वामदेव, स्वामी समर्थांपासून शंकर महाराज यांच्यापर्यंत अनेक जेष्ठ ऋषीमुनी आणि संतांनी येथे उपासना केल्याचे दाखले पुराणात सापडतात. सध्या हे मंदिर जीर्ण झाले असून याचा कारभार व देखभाल पुरातत्व विभागाकडे आहे. 

मात्र, अनेकवेळा तक्रारी करून देखील पुरातत्व विभागाकडे करण्यात आल्या होत्या. परंतु यावर आपल्या विभागाकडून काहीही कार्यवाही झाली नाही.

पण महाराष्ट्राचा प्रसिद्ध आणि लोकांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या ऐन गणेशोत्सवच्या काळात मात्र पुरातत्व विभागाने या देवस्थानच्या आवारातील बांधकामाची तोडफोड केली. हा प्रकार नक्कीच गंभीर आणि चिंताजनक असल्याचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी म्हंटले आहे. याबाबत डॉ.गोऱ्हे यांनी सोलापूर पोलीस अधीक्षक श्रीम तेजस्वी सातपुते यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क करून कारवाई करण्याची सूचना केली आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांनी यात लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करण्याबाबत सांगितले आहे. 

याबाबत डॉ.गोऱ्हे यांनी भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक डॉ राजेंद्र यादव यांना निवेदनाच्या माध्यमातून पुढील सूचना केल्या आहेत यात,

◆ पुरातत्व विभागाने पुरातन मंदिरे, किल्ले यांची दुरुस्ती करण्याचा एक सुनियोजित प्लॅन तयार करून काम करावे आणि स्थानिक नागरिकांना यात सामावून घ्यावे.

◆ अशी कुठलीही कार्यवाही करायच्या वेळी स्थानिक राज्य सरकारच्या अथवा राज्य पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊनच सदर कार्यवाही करावी.

◆ पुरातत्व वास्तूंच्या नागरिकांनी दुरुस्तीबाबत दिलेल्या तक्रारीनंतर त्वरित दुरुस्ती करावी त्यात दिरंगाई करू नये. यामुळे लोकभावना जपणूक होऊन या प्रकारची कामे बिनधोकपणे करता येतील असे सुचविले आहे.