परभणी/प्रतिनिधी:-केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजनासारख्या विविध योजनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होत आहे याची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक आज गुरुवारी (दि.१) परभणी जिल्ह्यात दाखल झाले आहे. 

आज गुरुवारी (दि.१) केंद्र शासनाच्या पथकाची मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्यासोबत जिल्हा परिषदेत संवाद बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यात शासनामार्फत राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती सीईओ टाकसाळे यांनी देत उपस्थितांशी संवाद साधला. तर डीआरडीच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांनी प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती दिली. यावेळी नरेगाचे उप जिल्हाधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संदीप घोन्सीकर, स्वच्छ भारत मिशनचे उप मुख्य कार्यकारी राजेंद्र तुबाकले, नरेगाचे गट विकास अधिकारी जयंत गाढे यांच्यासह आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

केंद्र शासनाचे पथक दि. १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात असून पूर्णा, सेलू आणि जिंतूर तालुक्यातील निवडक १२ ग्रामपंचायतींची पाहणी करून केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या पथकात अश्विन रावल आणि ऋषभ जोशी यांचा समावेश आहे.

आज गुरुवारी (दि.१) केंद्र शासनाच्या पथकाने पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर आणि चुडावा या ग्रामपंचायतीना भेटी दिल्या. यावेळी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुलाची पाहणी केली तर नरेगा अंतर्गत सार्वजनिक विहीर, रस्ता, वैयक्तिक विहिरीची पाहणी करून योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.             

पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर आणि चुडावा येथील केंद्रीय पथकाच्या भेटी दरम्यान नरेगाचे उप जिल्हाधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड, नरेगाचे गट विकास अधिकारी जयंत गाढे, पूर्णाच्या गट विकास अधिकारी सुनीता वानखेडे, प्रभारी कृषी अधिकारी राजेश कापुरे, उप अभियंता श्रीकृष्ण वसेकर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी, ग्रामरोजगार सेवक, सरपंच, ग्रामसेवक आदींची उपस्थिती होती.