नाशिक : कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांनी सार्वजनिक गणेशोत्सव जल्लोषात साजरा होतो आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सव मंडळांमध्ये मोठा उत्साह असून, आरास, देखावे उभारण्यात आलेले आहेत.
आरास व देखावे पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने त्यापार्श्वभूमीवर भाविकांना वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये, त्यामुळे गणेशोत्सव काळात सायंकाळच्या सुमारास शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी यांनी शहरातील काही मार्गात बदल केले आहेत.
बदल केलेल्या मार्गांवर पर्यायी मार्ग सूचविण्यात आले असून वाहनचालक व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
गणेशोत्सवात भाविकांकडून आरास-देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. उद्यापासून (ता.३) ते येत्या गुरुवारपर्यंत (ता.८) सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत हे बदल असतील.
तसेच या मार्गांवरून पोलीस सेवेतील वाहनांना, रुग्णवाहिका, शववाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना प्रवेश राहणार आहे. त्याचप्रमाणे ज्या मार्गावरून वाहतूक बदल केले आहेत, तसेच स्थानिक रहिवाशांना या मार्गातील वाहतूक बदल लागू राहणार नाही, असेही वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे.
वाहतूक मार्गातील बदल :
* निमाणी बसस्थानक येथून पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, रविवारी कारंजा, शालिमार मार्गे जाणाऱ्या शहर बसेस, जड वाहतूकीला प्रवेश बंद.
* निमाणीकडून जाणाऱ्या शहर बसेस पंचवटी कारंजा, काट्या मारुती चौक, संतोष टी पॉईंट, कन्नमवार पुल, द्वारका सर्कलमार्गे नाशिक, नाशिकरोड, अंबड, सातपूरकडे जातील.
* सीबीएसकडून पंचवटीकडे जाणाऱ्या शहर बसेस, जड वाहनांना अशोकस्तंभ, रविवार कारंजा मार्गे प्रवेश बंद.
* सीबीएसकडून जाणाऱ्या बसेस अशोकस्तंभ, रामवाडी पुल, मखमलाबाद नाका, पेठनाका सिग्नल, दिंडोरी नाकामार्गे निमाणीकडे जातील.
* मोडक सिग्नल, खडकाळी सिग्नल येथून किटकॅट चौफुलीकडे येणारी वाहतूक; कालिदास कलामंदिरमार्गे सुमंगल दुकानाकडे ये-जा करणारी वाहने सारडा सर्कल, गडकरी सिग्नल, मोडक सिग्नलकडून सीबीएस सिग्नल या मार्गाचा वापर करतील.
हे रस्ते असतील वाहतुकीसाठी बंद :
* मोडक सिग्नल, खडकाळी सिग्नल ते कालिदास कलामंदिरा मार्गे शालिमार
* सीबीएसकडून गायकवाड क्लास, कान्हेरेवाडी मार्गे किटकॅट, सुमंगल कपड्यांचे दुकानाकडे व किटकॅटकडून सीबीएसकडे ये-जा करणारी वाहतूक दोन्ही बाजूने बंद
* सरदार चौक ते काळाराम मंदिर रस्ता दोन्ही बाजूने बंद
मालविय चौक ते गजानन चौक व गजानन चौक ते नागचौक, नागचौक ते शिवाजी चौक, शिवाजी चौक ते मालविय चौक दोन्ही बाजूने बंद
* सारडा सर्कल-खडकाळी सिग्नल-शालिमार मार्गे सीबीएसकडे जाणारी वाहतूक बंद
* खडकाळी सिग्नल ते नेहरू गार्डनकडून मेनरोड व बादशाही कॉर्नरकडे जाणारा रस्ता
* त्र्यंबक पोलीस चौकी ते बादशाही कॉर्नरपर्यंतचा रस्ता
* गाडगे महाराज पुतळा ते धुमाळ पॉइंट ते मंगेश मिठाई कॉर्नर
* सीबीएसकडून शालिमार व नेहरु गार्डनकडे जाणारा रस्ता
* मेहेर सिग्नलकडून सांगली बॅंक सिग्नल - धुमाळ पॉइंट - दहीपुलकडे जाणारा रस्ता
* प्रतिक लॉजकडून नेपाळी कॉर्नरकडे जाणारा रस्ता
* अशोक स्तंभाकडून रविवार कारंजा तेथून मालेगाव स्टॅंडकडे जाणारा रस्ता
* रविवार कारंजाकडून सांगली बॅंक सिग्नलकडे जाणारा मार्ग