परळी (प्रतिनिधी)
माजी सामाजिक न्याय मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना धनंजय मुंडे यांनी केलेल्या शेरोशायरीतून आणि भाषणातून आगामी नगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीचे रणसिंग फुंकलयाचे बोलले जात आहे.
नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेश सार्वजनिक महोत्सवाच्या दहा दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार धनंजय मुंडे व सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते काल रात्री धुमधडाक्यात पार पडले. मोंढा मार्केट येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंडपामध्ये हजारोंच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उद्घाटनानंतर बोलताना आमदार धनंजय मुंडे यांनी राहत इंदोरी यांची शेरोशायरी सादर केली.
राहत मे खतरे बहुत है
लेकिन ठहरता कौन है
मौत कल आती है, आज आ जाय
डरता कौन है
तेरे लष्कर के मुकाबले अकेला हू मै
मगर फैसला मैदान मे होगा की
मरता कौन है
धनंजय मुंडे यांनी सादर केलेल्या या शेरोशायरी ला उपस्थित हजारो रसिकांनी आणि परळीकरांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. एक प्रकारे या शायरीतून धनंजय मुंडे यांनी विरोधकांना नाव न घेता आगामी निवडणुकीतील मैदानात लढण्यासाठी मी सज्ज असल्याचे सूचक वक्तव्य केले. समोर कितीही मोठी फौज असू द्या विजयी होणारच असा आत्मविश्वास त्यांनी बोलून दाखविला.
थोड्याच दिवसात परळी नगरपालिकेच्या निवडणुका लागू शकतात. त्यानंतर एक ते दीड वर्षात विधानसभेची रणधुमाळी सुरू होणार आहे. या दोन्ही निवडणुका धनंजय मुंडे यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणूनच वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवाच्या तयारीमध्ये आणि गर्दी खेचण्यामध्ये त्यांनी कोणतीही कमतरता ठेवली नाही. सिने अभिनेते, अभिनेत्री, चला हवा येऊ द्या, महाराष्ट्राची हास्य जत्रा, आदर्श शिंदे, इंदुरीकर महाराज, महाराष्ट्रातील मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे संगीतकार अजय अतुल, त्याचबरोबर अमृता खानविलकर कवाली मुकाबला, सिने अभिनेत्री ईशा देवल, मानसी नाईक असे डझनभर पेक्षा जास्त कलाकारांना करोड रुपये खर्च करून परळी मध्ये निमंत्रित केले आहे.
वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून परळीकराना सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे. परंतु याच माध्यमातून आगामी नगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीत आपण सज्ज असल्याचा इशारा धनंजय मुंडे यांनी विरोधकांना दिला आहे.