रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील धनगर वाडी ते महालोर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात महिलेस जीवेठार मारून तिचे प्रेत जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न अज्ञात आरोपी याने केला आहे.याबाबत मुरूड पोलीस ठाण्यात फिर्यादी पांडुरंग दौलत पानगळे( वय ५६वर्षे,पोलीस पाटील,राहणार-गोपळवट,तालका-रोहा,जिल्हा रायगड) यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,मुरूड तालुक्यातील मौजे धनगर वाडी ते महालोर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या अंदाजे दहा ते पंधरा दिवसांपूर्वी जंगलभागात अज्ञात आरोपी याने अज्ञात कारणावरून अज्ञात महिलेस जीवेठार मारून तिचा मृतदेहावर लाकडे रचून अग्नी देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.याबाबतची फिर्याद पोलीस पाटील पांडुरंग दौलत पानगळे यांनी मुरूड पोलीस ठाण्यात आज दिनांक(१सप्टेंबर२०२२) रोजी दिली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी जितेश काकडे ,मुरूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
मुरुड पोलीस ठाणे गु. रजिस्टर नंबर 119/ 2022 भादवी कलम302,201 दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक तपास पोलीस अधीक्षक अशोक दुधे,यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी जितेश काकडे यांच्या सूचनेनुसार तपास मुरूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन गवारे करीत आहेत.