जिल्ह्यातील अद्यापही निदान न झालेल्या कृष्ठरुग्णांचा व सक्रीय क्षयरुग्णांचा व्यापक मोहिम राबवून शोध घ्यावा. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.   कृष्ठरुग्ण शोध मोहिम व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम 2022-23 च्या अनुषंगाने जिल्हा समन्वय समितीची सभा 29 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरुन श्री. षण्मुगराजन बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. संजय देशपांडे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मिलींद जाधव, जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागार डॉ. सुवर्णा रामटेके, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री. ससे व सर्व तालुका अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.  श्री. षण्मुगराजन म्हणाले, या शोध मोहिमेत जिल्हयातील सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात यावी. तसेच याबाबतचे प्रशिक्षण संबंधित अधिकारी/कर्मचारी यांना देण्यात यावे. माहिती, शिक्षण व संवादातून जास्तीत जास्त जनजागृती करण्यात यावी. कृष्ठरुग्ण व सक्रीय क्षयरुग्णांचा शोध घेण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात यावे. अति जोखमीचे क्षेत्र निवडण्यात यावे. ज्यामध्ये कृष्ठरुग्ण व सक्रीय क्षयरुग्ण आढळून येतील. यासाठी प्रयत्न करण्यात यावे. गलिच्छ वस्त्यांमध्ये क्षयरुग्णांचा शोध घेण्यासाठी त्यांची आरोग्य तपासणी करुन क्षयरोगाचे लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींवर आषधोपचार करण्यात यावे. असे ते यावेळी म्हणाले. १३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण जिल्हयात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरोग शोध मोहिम व राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम संयुक्तपणे राबविली जाणार आहे. या सभेत कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण मोहिमेचे नियोजन व प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.   समाजातील निदान न झालेल्या कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण लवकरात लवकर शोधुन त्वरीत उपचाराखाली आणणे. नविन सांसर्गिक रुग्ण शोधुन त्वरीत औषधोपचाराव्दारे संसर्गाची साखळी खंडीत करून होणाऱ्या रोगाचा प्रसार थांबविणे. समाजातील कुष्ठरोग व क्षयरोगविषयी जनजागृती करणे. कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करुन कुष्ठरोगाचे निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करणे. संशयीत क्षयरुग्णाचे थुंकी नमुने व एक्स-रे तपासणी तसेच आवश्यकतेनुसार इतर तपासणी करुन त्यांच्यावर तात्काळ औषधोपचार चालु करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.   १३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्हयात घरोघरी जाऊन ग्रामीण भागातील पुर्ण लोकसंख्या 10 लक्ष 37 हजार 689 व व शहरी भागाची ३० टक्के लोकसंख्या ८१ हजार ६० अशी एकुण 11 लक्ष 18 हजार 749 या लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात ८६६ चमुचे नियोजन करण्यात आले आहे. एका चमूमध्ये एक पुरुष स्वयंसेवक व एक आशा वर्करचा समावेश राहील. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी १७३ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदरील मोहिमेत आढळून आलेल्या संशयीतांची तपासणी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात ७ दिवसाचे आत करण्यात येणार आहे. मोहिमेचा अहवाल दररोज तालुकास्तरावरुन जिल्हास्तरावर व जिल्हास्तरावरून राज्यस्तरावर त्याच दिवशी पाठविण्यात येणार आहे.