परभणी/प्रतिनिधी:-परभणी शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी श्रीमती तृप्ती सांडभोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पनवेल महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत होत्या. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने दिनांक 30 ऑगस्ट रोजी नियुक्तीचे आदेश काढले आहेत. अवर सचिव अ.का. लक्कसे यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. पनवेल महानगरपालिकेत कार्यरत अतिरिक्त आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर यांची प्रशासकीय कारणास्तव नांदेड वाघाळा महापालिका येथे त्याच पदावर पदस्थापना करण्यात आली होती. दरम्यान, या पदस्थापनेत अंशतः बदल करण्यात येऊन श्रीमती सांडभोर यांची परभणी महानगरपालिका आयुक्त पदावर पदस्थापना करण्यात आली आहे. त्यांनी आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारावा व तसा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा असे नियुक्ती आदेशात म्हटले आहे. दरम्यान नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त सुनील लहाने यांची परभणी मनपा आयुक्त पदावर करण्यात आलेली नियुक्ती रद्द झाली आहे. लहाने हे नांदेड वाघाळा मनपा आयुक्त या पदावर पुढील आदेशापर्यंत कार्यरत राहतील त्या आदेशात म्हटले आहे.          

डॉ. लहाने यांची बदली ठरली औटघटकेची       

नांदेड -वाघाळा महानगरपालिका आयुक्त डॉ . सुनील लहाने यांची बदली काही तासांचीच ठरली. रात्रीतून निघालेले आदेश हे रात्रीतूनच रद्द झाले आहेत.तर नांदेड येथे आयुक्त म्हणून ज्यांचे आदेश निघाले होते , त्या तृप्ती सांडभोर या परभणी मनपा आयुक्त म्हणून जाणार असल्याचे नव्या आदेशाने समोर आले आहे. डॉ . लहाने व सांडभोर या दोघांच्या बदल्यांचे आदेश रात्रीतूनच औटघटकेचे ठरल्याचे बघायला मिळाले.