परभणी/प्रतिनिधी:-विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या संकल्पनेतून आणि जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेतील शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध क्लब तयार करत अभिनव उपक्रम राबवून जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन वृद्धिंगत करण्याच्या सूचना शिवानंद टाकसाळे यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सव कार्यक्रमा निमित्त सोमवारी (दि.२९) परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी शहरातील कन्या प्रशाला येथे जिल्हाभरातील सर्व तालुक्यांचे गट शिक्षणाधिकारी जिल्ह्यातील ८६ केंद्रप्रमुख केंद्रातील उपक्रमशील ८६ शिक्षक व प्रत्येक तालुक्यातून एक तंत्रस्नेही शिक्षक तसेच जिल्हा गुणवत्ता कक्षातील ५० शिक्षकांची जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली.

यावेळी बैठकीसाठी माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी आशा गरुड, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे सर्व तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी, जिल्ह्यातील 86 केंद्राचे केंद्रप्रमुख 86 शिक्षक यांची उपस्थिती होती.  

सीईओंनी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अध्ययनस्तर निश्चित करणे, शास्त्रज्ञांच्या जयंत्या साजऱ्या करून त्यांची ओळख करून देणे. परमवीर चक्र विजेते व ऑलम्पिक विजेते खेळाडूंच्या शौर्यगाथा सांगणे. वन्य जीव संरक्षण व संवर्धन पर्यावरण पूरक यासाठी वाईल्ड लाईफ ग्रुप करणे. अवकाश निरीक्षण ग्रुप तयार करणे.जिल्ह्यातील विविध खेळात विजयी झालेल्या खेळाडूंची ओळख करून त्यांचा सन्मान करणे.तालुका व जिल्हा स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करणे. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक व अध्ययन वाढीसाठी लेखन स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, कविता वाचन स्पर्धा अशा उपक्रमांचे आयोजन करणे. प्रयोगशाळा निर्मिती करणे आदींचा यात समावेश आहे.

विभागीय आयुक्त केंद्रेकर, जिल्हाधिकारी गोयल यांच्या सोबत झालेल्या बैठकीतील तपशील सांगताना टाकसाळे म्हणाले की "शिक्षकांनी गुणवत्ता वाढीचे उपक्रम युट्युबच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रसिद्ध करावे. परभणी जिल्ह्याच्या गुणवत्तेचे नाणे खणखणीत कसे आहे हे सिद्ध करावे. नासाची औंढा नागनाथ येथील लीगोइंडिया प्रयोगशाळेस शिक्षक व विद्यार्थी यांनी भेट द्यावी. शरीराला व्यायामाची आवड लावण्यासाठी अमरावती येथील हनुमान व्यायाम शाळा, डॉ रामेश्वर नाईक यांच्या माध्यमातून आकाशदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करणे, निवडक शाळेतील विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार शिबिराचे आयोजन, शाळा तिथे रोपवाटिका तयार करणे, जिल्हा परिषदेच्या शाळांना अधिकाऱ्यांच्या भेटी व त्यांचे अध्यापन आयोजन करावे. जिल्हाभरातील उपक्रमशील शिक्षक, गट शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख यांच्या विशिष्ट पथकाने भेटी देऊन तेथील माहितीचे संकलन करावे व विद्यार्थ्यांसमोर त्याचे सादरीकरण व्हावे. जिल्हाभरातील सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात काम करण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण तयार करावे व 17 सप्टेंबरच्या आत सर्व स्पर्धा जिल्हास्तर,तालुकास्तर केंद्रस्तर घ्याव्यात अशा सूचना दिल्या.

त्या समवेतच जिल्हाधिकारी यांनी सुचित केल्यानुसार विद्यार्थ्यांसाठी प्रथमोपचारा बाबत माहितीपर कार्यशाळा घेणे, जिल्हाभरात सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्येक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी हितगुज साधावा व शिक्षकांच्या समस्या जाणून घ्याव्यात याबाबतही सूचना यावेळी देण्यात आल्या. दिवसभर झालेल्या उपक्रमात शिवनेरी आश्रम शाळा जवळा बाजार येथिल विज्ञान ,गणित विषय उपक्रमशिल शिक्षक नागेश वाईकर यांची लॅब इन द कॅरीबॅग टाकाऊ पासून टिकाऊ प्रयोगशाळा ही व्दितीय सत्रात संपन्न झाली. कार्यक्रमाचे प्रास्तविक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी केले सूत्रसंचालन मानवतचे केंद्रप्रमुख शिरीष लोहट यांनी,तर आभार प्रदर्शन सुधीर सोनुनकर यांनी केले.