गणेशोत्सव दि.31 ऑगस्ट 2022 पासून सुरु होत आहे.गणेशोत्सवासाठी कोकणात राज्याच्या विविध शहरातून नागरिक येत असतात. गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात येणाऱ्या गणेश भक्तांनी शासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी आज येथे केले. येथील जिल्हा नियोजन भवन बैठक सभागृहात " गणेशोत्सव 2022 " बाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. 

    यावेळी अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पोलीस विभाग, राष्ट्रीय मार्ग विभागांचे विभागप्रमुख, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, विविध शासकीय विभागांचे कार्यालय प्रमुख, शांतता कमिटीचे सदस्य आदी उपस्थित होते.

    अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी गणेशोत्सव 2022 च्या तयारीच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, राज्य परिवहन महामंडळ, पोलीस, अन्न व औषध प्रशासन, कोकण रेल्वे, रस्ते वाहतूक अशा विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रत्येक विभागाने काय तयारी केली आहे, हे जाणून घेतले. त्यानुषंगाने अपर जिल्हाधिकारी श्री.यादव यांनी राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्यांवरील खड्डे भरण्याबाबतची कार्यवाही, रस्ते दुरूस्ती, आवश्यक त्या ठिकाणी जेसीबी, पोकलेन, डंपर सज्ज ठेवणे याबाबत आवश्यक निर्देश दिले.

    महावितरणच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या की, गणेशोत्सव कालावधीत जिल्ह्यात विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही, याची दक्षता घ्यावी. राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना ग्रामीण भागात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एसटीच्या फेऱ्या वाढवून जिल्ह्यात येणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी. पोलीस विभागाने गणेशोत्सव काळात महामार्गावरील वाहतूक सुरळितपणे होईल, असे पहावे. याचबरोबर पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभागांनी गणेशोत्सव काळात राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरक्षित व सुरळीत सुरू राहील, अपघात होणार नाही, यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, बंदोबस्त चोख ठेवावा, इतर विभागांशी योग्य तो समन्वय राखून भाविकांना गरज पडेल तेव्हा मदत व मार्गदर्शन करावे, अशा सूचना पोलीस विभागाच्या व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.     

       सण-उत्सवाच्या काळात काही व्यापारी खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करतात. त्यांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी मोहीम घेऊन अशा प्रकारे खाद्यपदार्थ, प्रसाद यामध्ये भेसळ होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. रेल्वे प्रशासनाने रेल्वे लाईनच्या बाजूला वाढलेले गवत कापून टाकण्याची कार्यवाही तत्परतेने करावी, असे निर्देश रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले. 

      शेवटी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी सर्वांसाठी महत्त्वाच्या असलेल्या गणेशोत्सव या सणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक यंत्रणेने आपापसात योग्य तो समन्वय राखावा, प्रत्येक विभागाने आपापली भूमिका जबाबदारीने पार पाडावी, असे आवाहन उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना केले.

००००००