सातपूर (जि. नाशिक) : पाच दिवसांपासून सातपूर विभागात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. टँकर येण्याचे मागे आमचाच दबदबा असल्याचा दिखावा काही जण करीत असल्याचे नागरिकांनी सांगितले, तर आमच्याच पैशांनी आम्ही जनतेला पाणी वाटत आहोत, असा खोटा आवही काही जण आणत असल्याचेही काही नागरिकांनी सांगितले.
सातपूरमध्ये कामगार वस्ती असल्याने येथील बहुतांशी नागरिक कारखान्यांमध्ये रोजंदारीवर कामासाठी जातात. मात्र, चार ते पाच दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना रोजगार बुडवून पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. महापालिकेतर्फे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. १९९२ ला त्र्यंबक रोड आणि शिवाजीनगर ते गंगापूर रोडपर्यंत बाराशे एमएमची सिमेंटची जलवाहिनी टाकली होती.
काही दिवसांपूर्वी त्र्यंबक रोडवरील अमृत गार्डन हॉटेलच्या बाजूला एका राष्ट्रीय गॅस कंपनीचे काम सुरू असताना, तेथे कंपनीतर्फे बोरिंगसाठीव खड्डे खोदले जात असताना, सिमेंटची जलवाहिनी फुटली असल्याचे दिसून आल्याची शक्यता वर्तविली जात आहे. गॅस लाईनच्या कामामुळे जलवाहिनीला भोक पडले. ती सिमेंटची असल्यामुळे त्या छिद्राचा परिघ वाढत गेल्याने प्रचंड प्रमाणात जलवाहिनीचे नुकसान झाले व तेथूनच जलप्रवाहाचा विसर्ग होऊ लागल्याचे प्रत्यक्षदर्शींच्या लक्षात आले.
काही पत्रकार व स्थानिक नागरिकांनी सातपूर विभागीय कार्यालयाला याची माहिती दिली असता, प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करण्याचे आदेश दिले. या कामासाठी माहिती असलेला कंत्राटदार उपलब्ध नसल्याने, दुसऱ्या दिवशी या कामाचे सूत्र एका विशेष कंत्राटदाराला देण्यात आले.
मात्र, त्या ठिकाणी पाण्याचा विसर्ग होत असल्याने नेमके कारण कळत नव्हते. त्यामुळे कसे काम करावे? त्यात दिवस निघून गेला. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने तेथे २५ फूट खोदाई करून कुठला पाईप फुटला आहे, याची चाचपणी करण्यात आली. गुरुवारी (ता. २५) सिमेंटची जलवाहिनी फुटल्याचे निष्पन्न झाले. त्या ठिकाणी तत्कालीन व्यवस्था म्हणून लोखंडी जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेतला आहे, तरी तो तात्पुरते स्वरूपात कामी येणारा आहे.
बाजारातुन बाराशे एमएमचा पाईप उपलब्ध होत नसल्याचे बघून अंबड लिंक रोडवरून याच लांबी रुंदीचा पाईप मिळविण्यात प्रशासनाला यश आले. काम करीत असताना, याला अधिकचा कालावधी लागू शकेल, असे लक्षात येताच दुसरा पर्याय म्हणून पपया नर्सरीसमोरील सिग्नलच्या कडेला असलेल्या जलवाहिनीचा आधार घेण्यात आला आहे व ती जलवाहिनी सातपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला जोडण्याचे काम युद्धपातळीवर कर्मचारी व अधिकारी करीत आहेत.
याबाबत तपशील घेतला असता जोडणीचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून, जलवाहिनी जोडल्यानंतरही यातून जलप्रवाह व्यवस्थित प्रवाहित होतो की नाही, याची चाचणी प्रशासनातर्फे घेतली जाणार आहे. त्यानंतर जलवाहिनीची जलप्रवाह जलकुंभांमध्ये एकत्रित टाकण्यात येईल, त्यानंतरच नागरिकांना पाणी सोडण्यात येईल. म्हणजेच सोमवारी (ता. २९) पाणीपुरवठा होईल, असा अंदाज आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांनी सांगितले. यापूर्वीची सिमेंटची जलवाहिनी व्यवस्थित झाल्यानंतरचच पाण्याच्या प्रवाहात वाढ होण्याची शक्यता आहे.