सौंदा मठाचे भट्टारकश्री अकलंक स्वामीजी शोभायात्रेत

सोलापूर :- श्री माणिक स्वामी दिगंबर जैन मंदिराचा शुद्धी सोहळा अत्यंत आनंदमय भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला. प्रातःकाली घटयात्रा श्री आदिनाथ महाराज व रत्नत्रय दिगंबर जैन मंदिर माणिक चौक येथून सुरू झाली. ती भुसार पेठेतल्या श्री माणिक स्वामी जीन मंदिरापर्यंत पोहोचली. या मिरवणुकी मध्ये मुख्य कलशधारक, शांतीसागर कलशधारक महिला, इंद्र - इंद्रायणी व चक्रवर्ती यांच्यासह सौंदा मठाचे भट्टारकश्री अकलंक स्वामीजी हे भव्य शोभायात्रेत उपस्थित होते. 

"माणिक स्वामी भगवान की जय, भगवान महावीर की जय, अहिंसा परमो धर्म की जय," या जयघोषामध्ये सर्व भाविकांच्या आवाजात वातावरण दुमदुमून गेले. त्यानंतर विक्रम गांधी यांच्या हस्ते दक्षिण महाद्वाराचे भव्य पूजन व उद्घाटन झाले. डॉ. रणजीत गांधी आणि त्यांचे सुपुत्र वैभव व ब्रिजेश यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. ध्वजारोहणानंतर भव्य शिखर पूजन राजन कांतीलाल गांधी यांच्या परिवारातर्फे झाले व गर्भगृहाचे पूजन पृथ्वीराज गांधी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मूलनायक भगवंतांचा भव्य अभिषेक सोहळा व शांतीधारा पार पडले. 

त्यानंतर सर्व शांतीसाठी श्री यागमंडल विधान पूजन व दुपारच्या सत्रामध्ये जीर्णोद्धार केलेल्या मूर्तीवर भव्य असे मंत्र संस्कार झाले. सायंकाळी संगीतमय आरती व त्यानंतर विद्यार्थी, श्रावक व श्रविकांनी केलेले भव्य असे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. डॉ. महावीर शास्त्री यांनी दिवसभरातील सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. दोन्ही सत्रामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

वालचंदमध्ये आज मंगल प्रवचन व भक्तीगीत

सोमवारी २९ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ६ वाजता शुभप्रभात मंगल वाद्य, अभिनव दिश बीजाक्षर जाप, श्री जिनेन्द्राभिषेक व पूजन, श्री कालीकुंड पार्श्वनाथ विधान,लवंगाहुती जाप, अभिनंदन सभा, त्यागी प्रवचन, नूतन छत्रार्पण, पालखी महोत्सव आणि महाप्रसाद या कार्यक्रमाबरोबर वालचंद कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल हॉलमध्ये दुपारी ३.३० वाजता वालचंद शिक्षण समूहाच्यावतीने मंगल प्रवचन व भक्तीगीत होणार असून त्यानंतर महाप्रसादाने दोन दिवशीय भक्ती कार्यक्रमाची सांगता होईल.