शिरुर: नातीची शाळेत छेड काढल्याच्या गैरसमजातुन शिरुर तालुक्यात एका 12 वर्षीय शालेय विद्यार्थ्याला वायरने पाठीवर, मानेवर, हातावर, तोंडावर अमानुषपणे मारहाण करत असताना त्या मुलाची आई मध्ये पडली असता तिलाही वायरने पाठीवर, पोटात तसेच पायावर मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ करुन विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असुन सदर महिलेच्या तक्रारीवरुन शिरुर पोलिसांनी याबाबत दोन जणांवर जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण, तसेच विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सरदवाडी (ता. शिरुर) येथे फिर्यादी महिला आपल्या पती व दोन मुलांसह राहण्यास असुन (दि 27) रोजी या महिलेचा 12 वर्षीय मुलगा दुपारी 12:30 च्या सुमारास शाळेतून घरी आला आणि कपडे बदलून जवळच असलेल्या नातेवाईकांच्या घरी गेला. त्यानंतर दुपारी 1 च्या सुमारास फिर्यादी महिलेचा दुसरा मुलगा घाईघाईत घरी पळत आला. आणि त्याने 'मम्मी लवकर चल येथील हॉटेल मेसाईचे मालक आपल्या भैयाला मारत असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी महिला गडबडीत मेसाई हॉटेलचे मालक रंगनाथ कर्डीले यांच्या घरी गेल्या त्यावेळेस घराच्या बेसमेंटमध्ये रंगनाथ कर्डीले फिर्यादी महिलेच्या मुलास केबलच्या वायरने पाठीवर, मानेवर, हातावर तोंडावर मारहाण करीत होते तसेच विवेक रंगनाथ कर्डीले हा हाताने मारहाण करीत होता.
त्यावेळेस सदर महिलेने त्यांना माझ्या मुलाचं काही चुकलं असेल तर मला सांगा, त्याला मारु नका, त्याला सोडा असे म्हणतं त्यांची विनवणी करत मध्ये पडुन मुलास त्यांच्या तावडीतून वाचवन्याचा प्रयत्न केला. परंतु रंगनाथ कर्डीले याने फिर्यादी महिलेस जातिवाचक शिवीगाळ करत 'तुम्ही बाहेरुन पोट भरायला आलात, नीट रहा नाहीतर तुझ्या पोराला शाळेतून काढून टाकायला लावील, तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करीन. तुम्हाला जीवे मारील, तुमचा बिस्तारा गुंडाळुन तुम्हाला हाकलून देईल असे म्हणत फिर्यादी महिलेला वायरने पाठीवर, पोटात व पायावर मारहाण करत विनयभंग केला. त्यानंतर सदर महिला मुलाला घेऊन जवळच राहत असलेल्या नातेवाईकांकडे गेली. त्यानंतर नातेवाईकांना घेऊन तिने शिरुर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. सदर महिलेच्या फिर्यादीवरुन रंगनाथ कर्डीले आणि विवेक रंगनाथ कर्डीले दोघेही (रा. सरदवाडी, ता. शिरुर, जि. पुणे) यांच्यावर शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन या घटनेचा पुढील तपास शिरुर विभागाचे उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी हे करत आहेत.