नाशिक : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत महापालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पथनाट्य व नृत्य स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांनी विविध कला सादर करत स्वच्छता, नदीप्रदूषण व प्लॅस्टिक बंदी संदर्भात जनजागृती करत उपस्थितांची दाद मिळविली.
कालिदास कलामंदिरमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी हवा, पाणी व जमीन प्रदूषण रोखण्याचे उपाय, प्लॅस्टिकचे दुष्परिणाम, स्वच्छता प्रती नागरिकांचे कर्तव्य, वृक्षारोपणाचे महत्त्व या ज्वलंत विषयांना हात घालत जनजागृती केली.
पथनाट्य व नृत्य स्पर्धेत २६ शाळांनी सहभाग घेतला. चौदा शाळांनी पथनाट्य, तर बारा फ्लॅश मॉब झाले. मराठी चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर, महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देवून गौरविण्यात आले.
अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे व अशोक अत्राम, शासनाचे उपसचिव रणजित पाटील, उपायुक्त विजयकुमार मुंढे, उपायुक्त डॉ. दिलीप मेणकर, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी सुनीता धनगर, आयटीचे विभागप्रमुख नितीन धामणे, नाशिक रोड विभागीय अधिकारी सुनील आव्हाड, सामाजिक कार्यकर्ते राजेश पंडित, निशिकांत पगारे, चंद्रकिशोर पाटील, हर्षल इंगळे, रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरीचे ओंकार महाले, डॉ. मीनल पलोड आदी उपस्थित होते.
हे संघ विजयी
नृत्य स्पर्धेत होरायझन स्कूल प्रथम, नगरकर गुरुकुल प्राथमिक विद्यामंदीर दुसरे, तर महापालिकेच्या वडाळा येथील शाळा क्रमांक ८५ ला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. पथनाट्य स्पर्धेत मराठा हायस्कूल, अंबड येथील विद्याविकास प्राथमिक माध्यमिक स्कूल व महापालिका शाळा क्रमांक ६८ ला अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. जतिंदरसिंह, पूनम आचार्य, श्रीराम गोरे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.
रोटरीचे ‘डिल ऑन व्हिल्स’
रोटरी क्लब ऑफ ग्रेप सिटीच्या वतीने शाळा स्तरावर सिंगल युज प्लास्टिक गोळा करण्यासंदर्भातील उपकरणाचे अनावरण या वेळी करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ नाशिक वेस्ट संस्थेने प्लास्टिक बंदीवर व्हिडिओ सादर केला. रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरीच्या वतीने सहभाग नोंदविण्यात आला. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी या स्पर्धेचे नियोजन केले होते. जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.