सिरसाळा (प्रतिनिधी) सोन्याचे आमिष दाखवून 2 जणांना तब्बल 16 लाखाला फसवण्यात आल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील सिरसाळ्यात घडली आहे. एकाला 14 लाखाला तर दुसऱ्याला अडीच लाखाला फसवल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन्ही तक्रारी लक्षात घेता मोठी टोळी सक्रीय असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिरसाळ्यात आणि परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून चोरटयांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. कुठे मोबाईल चोरी, केठे वाहन चोरी,कुठे म्हैस, शेळी, वाहन चोरी अशा विविध प्रकारच्या चोऱ्या होत आहे. पण यात आता बनावट सोने देऊन केलेली फसवणूक तर खूपच गंभीर प्रकार आहे.शहरात दोन व्यक्तींना सोन्याचे आमिष दाखवून तब्बल 16 लाखाला फसवण्यात आले आहे. सोने देण्याचे आमिष देऊन त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आले. यामध्ये एका जणांला तब्बल 14 लाखांना गंडा घातला आहे. तर दुसऱ्या एका व्यक्तीला अडीच लाखाला फसवले आहे. या प्रकरणी सिरसाळा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.