विषमता इथली गाढते, वामनची लेखणी

मनुवाद इथला फाडते, वामनची लेखणी - राष्ट्रीय प्रबोधनकार राहुल अन्वीकर

बीड(प्रतिनिधी):- राष्ट्रीय प्रबोधनकार तथा प्रसिद्ध गायक राहुल दादा अन्वीकर यांनी 'विषमता इथली गाढते, वामनची लेखणी

मनुवाद इथला फाडते, वामनची लेखणी'! हे चळवळीचे गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली.महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त २७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे गीत अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राहुल दादांना आमंत्रित करण्यात आले होते.यावेळी गायक कुणाल प्रतापसिंग बोदडे,कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे, प्रमुख अतिथी संदीप उपरे, पी.व्ही,बनसोडे, महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा.शरद वंजारे,प्रा.डॉ.संजय कांबळे,प्रा.दिपक जमधाडे, कॅप्टन राजाभाऊ आठवले यांची उपस्थिती होती.

गीत अभिवादन कार्यक्रम चळवळीच्या बहारदार भीम गीतांनी बहरला होता. यावेळी प्रसिद्ध गायक कुणाल दादा बोदडे यांनी चळवळीचे गीत सादर केले.'जो जय भीम का नारा देते है, वो लोग सिकंदर बनते है, जय भीम कि मस्ती मे वो अक्सर मस्त कलंदर रहते है!' तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत ' अहो, उजाड पुण्यात शिवबा धरतो सोन्याचा नांगर, सोन्याच्या पेनाने घटना लिहितो भीमराव आंबेडक, हा शिवबाचा पायगुण, बहरून आल सार पुण, तसाच हातगुण भिमाचा दिसतोय दिल्लीच्या तक्तावर, सोन्याच्या पेनाने घटना लिहितो भीमराव आंबेडकर!' या गीताने उपस्थितांमध्ये जोश निर्माण केला.प्रा.दिपक जमधाडे यांनी लढा पेटला,लढा पेटला हे चळवळीचे गाणे गायिले. यावेळी गीत अभिवादन कार्यक्रमात बीड जिल्ह्यातील नामांकित भीम गीत गायकांनी वामनदादा कर्डक यांना गीतांच्या माध्यमातून अभिवादन केले.या कार्यक्रमाला बीड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळाल्याने नाट्यगृह खचाखच भरले गेले होते. 

महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नालंदा फाउंडेशन बीड यांच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे यांच्या हस्ते करण्यात आले. गीतकार,कवी,दिग्दर्शक सारंग वामन पवार यांनी फुले,शाहू,आंबेडकर सांस्कृतिक चळवळीत दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदाना बद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी २५ हजार रुपयांचा चेक आणि मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.