मालेगाव तालुक्‍यातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र असलेल्या अवलिया महाराज संस्थान काळामाथा येथे पोळाच्या दुसऱ्या दिवशी पारंपरिक जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी व बंजाराबहुल क्षेत्रात येणाऱ्या या भागातील अवलिया महाराज संस्थान हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. परिसरातील जनतेची अवलिया महाराजांवर अपार श्रद्धा आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा मेळा कोरोनाच्या प्रभावाखाली रद्द करण्यात आला होता. मात्र यंदा कोरोना ने विश्रांती घेताच मोठ्या थाटामाटात जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे.अवलिया महाराजांना केलेला नवस पूर्ण करण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ या दिवशी घरातून बैलांवर द्वारका घेऊन पायी चालत काळमाथा मंदिरात पोहोचतात आणि मंदिराची प्रदक्षिणा करतात. मंदिरात अवलिया महाराजांची पूजा केली जाते. यावर्षी नवसाच्या 9 द्वारका घेऊन परिसरातील ग्रामस्थ बंजारा समाजातील महिलांनी ढोल ताशाच्या गजरात पारंपारिक नृत्याने धार्मिक गाणे म्हणत मंदिराला प्रदक्षिणा देत आपला नवस फेडतात  काळामाथा संस्थानमध्ये पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी पारंपरिक पद्धतीने जत्रा भरवण्याचा इतिहास खूप जुना आहे. या दिवशी परिसरातील हजारो ग्रामीण भाविक येथे जमतात. येथे येणाऱ्या सर्व भाविकांसाठी संस्थानतर्फे महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यावर्षी कोरोनाच्या विश्रांतीनंतर मोठ्या जल्लोषात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.