बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात चोर्‍या, दरोड्याच्या घटना वाढत असताना आता दुचाकीवरून प्रवास करणार्‍यांना अडवून लुटण्याच्या घटनाही घडू लागल्या आहेत. काल गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथील एका बँकेच्या कर्मचार्‍याला लुटल्याची घटना घडली होती तर मांजरसुंबा-ससेवाडी रोडवर एका दुचाकीस्वाराला अडवून त्याच्याकडील 1 लाख रुपये असलेली बॅग आणि हातातील दोन अंगठ्या हिसकावून घेतल्याची घटना 25 ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी काल नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

बारीकराव अंबादास घरत (वय 66 वर्षे, व्यवसाय शेती, रा. महाजनवाडी ता. बीड) हे दुचाकीवरून मांजरसुब्याकडून ससेवाडीकडे जात असताना रायगड धाब्याजवळील नदीच्या पुलावर त्यांच्या दुचाकीला एका दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात भामट्यांनी दुचाकी आडवी लावून धक्काबुक्की करत त्यांना मारहाण केली. त्यांच्या जवळील एक लाख रुपये असलेली पैशाची बॅग व हातातील पाच ग्रॅमची एक आणि सहा ग्रॅमची एक अशा दोन अंगठ्या बळजबरीने काढून घेतल्या. या प्रकरणी घरत यांनी नेकनूर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.