*शहरातील नागरिकांना दर्जेदार रस्ते उपलब्ध करुन द्यावे*
- जिल्हाधिकारी आंचल गोयल
परभणी,( दि.25 : परभणी शहरातील सर्व नागरिकांचा रस्त्याचा प्रश्न अतिशय जिव्हाळ्याचा आहे. पावसाळ्यात पाणी साचुन नागरिकांना रस्त्याने चालणे कठीण होत आहे. लोकांच्या सोयीसाठी रस्ते खुप महत्वाचे आहेत. शहरातील नागरिकांना चांगले रस्ते देण्याची मनपा प्रशासनाची जबाबदारी असून त्यासाठी तातडीने खड्डे बुजविण्याची मोहीम राबवून पावसाळ्यानंतर रस्त्याच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात करुन दर्जेदार रस्ते नागरिकांना उपलब्ध करुन द्यावेत. असे निर्देश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिले.
जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी शहरातील दर्गा परिसरातील सिमेंट रस्ता, जुना पेडगाव ते रायगड कॉर्नर, जेल कॉर्नरपासुन ते ग्रॅण्ट कॉर्नर आणि खंडोबा बाजार ते हडको, मोठा मारोती ते उघडा महादेव या रस्त्याची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयापासून ते देशमुख हॉटेल मार्गे उघडा महादेव रोडपर्यंत आज प्रत्यक्ष रस्त्यावरुन चालत पाहणी केली. यावेळी महापालिका आयुक्त देविदास पवार, कार्यकारी अभियंता एस.एस.पाटील, पोलिस निरीक्षक सचिन इंगेवाड, मनपाचे अभियंता पवन देशमुख, यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गोयल यांनी जूना पेडगाव रस्त्यावरुन चालत असतांना विवेकानंद नगर जवळच्या रस्त्याची प्रत्यक्ष मोजणी करुन रस्त्याची लांबी कमी भरत असल्याने अतिक्रमणे तातडीने काढावीत अशा संबंधीतांना सुचना केल्या. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आलेले रस्ते दुरुस्तीची कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेत करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सुमारे 5 किलोमिटर पायी चालत शहरातील रस्त्यांची व नाल्यांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली व जागोजागी त्यांनी शहराचा नकाशा पाहून रस्त्यांची रुंदीबाबत विचारणा करत संबंधित यंत्रणेला योग्य त्या सुचना दिल्या.
देशमुख हॉटेल जवळ नागरिकांनी रस्त्यांची कामे झाली नसल्याने प्रचंड प्रमाणात धुळ उडत असून खड्यांमुळे चालता येत नसल्याचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी सध्या पावसाळा सुरु असून तात्पुरती उपाययोजना म्हणून आपण खड्डे भरण्याचे आपण काम करत आहोत. पावसाळा संपताच रस्त्यांच्या व नाल्यांच्या कामांना सुरुवात करण्यासाठी शासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. जिल्हाधिकारी स्वत: रस्त्याची पाहणी करण्यासाठी प्रतयक्ष पायी चालत असल्याने यावेळी नागरिकांनी मनापासून आभार व्यक्त करुन लवकरच रस्ते व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.