रानभाजी महोत्सवाचा दुसरा दिवस हाऊसफुल्ल
शहरी नागरिकांना रानभाज्यांची माहिती व्हावी तसेच रानभाज्यांचे आहारातील महत्त्व समजावे या उद्देशाने सोलापूर जिल्हा परिषदेने रानभाजी महोत्सव आयोजित केला होता. दिनांक 24 व 25 ऑगस्ट हे दोन दिवस हा महोत्सव जिल्हा परिषदेच्या आवारात भरविण्यात आला होता.
उमेद अभियानाच्या माध्यमातून बचतगटांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे त्याचप्रमाणे बचतगटांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने देखील हा रानभाजी महोत्सव महत्वाचा ठरला.
*शहर जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी दिल्या भेटी*
सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी रानभाजी महोत्सवाला भेट दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार व उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी आमदार शिंदेंचे स्वागत केले. चिगळ आणि पालकाची भाजी यावेळी त्यांनी खरेदी केली. बचतगटाच्या माध्यमातून हा रानभाजी महोत्सव भरवून महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून दिल्या बद्दल आमदार शिंदेंनी जिल्हा परिषद प्रशासनाला धन्यवाद दिले. रानभाजीच्या महत्वाबरोबरच महिला बचतगटांना उत्पन्नाची संधी देण्याचे प्रशंसनीय पाऊल जिल्हा परिषदेने उचलले आहे. हा महोत्सव आणखी दोन ते तीन दिवस ठेवावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. रानभाज्यांची पाककृती तयार करणाऱ्या महिलांशी आमदार शिंदेंनी यावेळी संवाद साधला.
मोहळ तालूक्याचे माजी आमदार राजन पाटील यांनी देखील महोत्सवाला भेट दिली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे व उमेद अभिनयाचे जिल्हा व्यवस्थापक सचिन चवरे यांनी त्यांचे स्वागत केले. राजन पाटील यांनी देखील महोत्सवातून भाजी खरेदी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे उपस्थित होते. जिल्हा परिषदेत काही कामानिमित्त आलो होतो तेंव्हा येथे रानभाजी महोत्सव आयोजित केल्याचे समजले. जिल्हा परिषदेने चांगले नियोजन केले आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना उत्पन्नासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिला असे प्रतिपादन राजन पाटील यांनी केले.
सोलापूरातील पर्यावरण अभ्यासक निनाद शहा हे देखील आपल्या कुटुंबासह भेट देऊन येथील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.
दोन दिवसात शहरातील अनेक नागरीकांनी महोत्सवास भेट देऊन रानभाज्या खरेदी करून येथील रानभाज्यांच्या पाककृतीचा अस्वाद घेतला.
दोन दिवसात एकुण 29 बचतगट सहभागी झाले होते. 29 स्टॉलवर 268589 एवढ्या रुपयांची उलाढाल या रानभाजी महोत्सवात झाली.
याकामी जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, लेखाधिकारी सुजाता मानगावकर, जिल्हा व्यवस्थापक राहूल जाधव, संतोष डोंबे, भगवान कोरे, मिनाक्षी मदिवळी, अमोल गलांडे, पुनम दुध्य्याळ, शिवाजी वाघमारे, प्रमोद चिंचुरे, सादिक शेख, प्रदीप बंगळे यांनी परिश्रम घेतले.