मुंबई- एसटीच्या प्रवासात विविध घटकांतील सवलत धारकांना स्मार्टकार्ड बंधनकारक केले आहे. मात्र, अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव तसेच दिवाळीच्या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांची तसेच इतर सवलतधारकांची गैरसोय होऊ नये यासाठी नागरिकांच्या मुदतवाढीच्या मागणीच्या अनुषंगाने "स्मार्ट कार्ड" योजनेला नोंदणीकरण व वितरणासाठी ३१ ऑक्टोबर, २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

महाराष्ट्र शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना २५ टक्क्यांपासून १०० टक्केपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत दिली जात आहे. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेली "स्मार्ट कार्ड" काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्डासाठी नोंदणी करणे किंवा स्मार्टकार्ड घेणे शक्य झाले नाही. जुलैमध्ये आषाढी एकादशी निमित्त ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या मागणीनुसार या योजनेला ३१ ऑगस्ट, २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. 

तथापि, पुढील आठवड्यात ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२२ दरम्यान असलेला गणेशोत्सव तसेच दिवाळीच्या कालावधीतही ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मुदतवाढीच्या मागणीच्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांचे स्मार्टकार्ड नोंदणीकरण व वितरण करणेसाठी ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानुसार सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.