अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा अधिवेशन थाटात संपन्न !

किसान सभेच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ.शिवानंद झळके तर जिल्हा सचिव सुलेमान शेख यांची निवड

सोलापूर : साखर साठविता येते तशी दुधाची पावडर ही साठविता येते म्हणून ऊसाला जशी एफ आर पी देता येते तशी दुधालाही एफ आर पी दिली जावी अशी रास्त मागणी शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले यांनी केली. यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन लढण्याची नितांत गरज आहे.कारण हे सरकार कार्पोरेटधार्जिण्यांचे आहे.यांना शेतकऱ्यांची आर्त हाक ऐकू येत नाही यासाठी आवाज बुलंद करावा लागतो. ही लढ्याच्या माध्यमातूनच शक्य मजबूत एकजुटीची तयारी ठेवा अशा शब्दांत शेतकरी प्रतिनिधींना संबोधित केले.

शनिवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी अखिल भारतीय किसान सभा सोलापूर जिल्हा अधिवेशन कंदलगाव येथे किसान सभेचे राष्ट्रीय नेते किसन गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

 नवले पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात दर दिवशी एक कोटी तीस लाख लिटर दूध संघटित क्षेत्रात संकलित होते.बाकीच्या दुधाचा हिशोब नाही. या संकलित दुधापैकी फक्त 40 लाख लिटर दूध दररोजच्या वापरात येते ते लगेच विकले जाते. बाकीचे 90 लाख लिटर दूध पाण्यात जात नाही तर त्याचे तर त्याचे पनीर,श्रीखंड, केक,दही, लोणी,तूप, बासुंदी अशा वेगवेगळ्या पदार्थांसाठी उपयोग होतो. त्यातील बहुतांश दुधाचे पावडर करण्यासाठी वापर होतो. तयार झालेले पावडर सहा ते नऊ महिने साठवता येते त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दोन वर्षापर्यंत ते साठवता येते हे सत्य मंत्री, सरकार,सहकारवाले सांगत नाहीत शेतकऱ्यांना वेड्यात काढतात . दुधाची पावडर साठवता येते तर जसे ऊसाला जसा एफआरपीचे संरक्षण आहे तसे दुधालाही एफ आर पी चे संरक्षण मिळाले पाहिजे अशी रास्त मागणी या अधिवेशनात डॉक्टर अजित नवले यांनी केली आहे. आणि यासाठी येत्या काळात तीव्र लढा उभा केला जाईल असे म्हणाले.  

सोलापूर जिल्ह्यात मोठ मोठ्या नेत्यांचे मोठमोठाले साखर कारखाने आहेत.पण शेतकऱ्यांच्या उसाला मात्र ते रास्त भाव आणि दाम नाही देऊ शकत. एफ आर पी चे पैसे शेतकऱ्यांना वेळेवर दिले जात नाहीत. एफ आर पी चे पैसे ऊस तोडल्याच्या 14 दिवसाच्या आत मिळाले पाहिजे असा कायदा आहे. परंतु इथले तुमचे नेते ते देत नाहीत हे नुसते मोठमोठाले नेते आहेत ते नेते सोन्या-चांदीचे नव्हे तर कत्तलाचे नेते आहेत अशी टीका खरमरीत टीका त्यांनी केली.

राज्यातील सत्ता बदलावरती म्हणाले की सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्र अस्थिर करण्याचे पाप भाजपने केले आहे त्याचे अत्यंत वाईट परिणाम ग्रामीण भागातील जनतेला व शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे. मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले.सोयाबीन, कापूस, उडीद इतर पिकांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला पिकांचे पंचनामे वेळेत पूर्ण झालेले नाहीत. सरकार स्थापनेच्या 40 दिवसानंतर कृषी मंत्री निवडले गेले परंतु त्यांच्या कार्यालयाचे कामकाज अद्यापही सुरू झालेले नाही .शेतकऱ्यांना जनतेला वाऱ्यावर सोडून महाराष्ट्रातील नेते गुवाहाटीत झाडी,डोंगर, हॉटेल यांच्या गप्पात रंगले होते. गुवाहातीत जाऊन नाचत होते.यांना जनतेचे काही पडलेले नाही स्वतःची खुर्ची कशी टिकवायची सत्ता कशी उपभोगायची याचेच पडले आहे. अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी केली. राज्यकर्ते जनतेल, शेतकरी माय बापाला जाती-धर्माची भूल देऊन लुटायचं काम करीत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी या भुलीला बळी न पडता एकजूट होऊन आपल्या हककासाठी न्याय मागण्यासाठी संघटित होऊन लढले पाहिजे असे आव्हान त्यांनी यावेळी केले.

अखिल भारतीय किसान सभेचे सोलापूर जिल्हा ६ वे अधिवेशन कंदलगाव ता दक्षिण सोलापूर येथील केदारेश्वर सभागृहात पार पडले. या अधिवेशनात नूतन कमिटीची निवड करण्यात आली जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर शिवानंद जळके तर जिल्हा सचिव म्हणून कॉम्रेड सुलेमान शेख यांची एकमताने निवड करण्यात आली यात कॉम्रेड सिद्धप्पा कलशेट्टी व कॉम्रेड सुभाष बावकर ,दत्ता चव्हाण, रजाक मकानदार, जावेद आवटे यासह 23 जणांची समिती गठीत करण्यात आली.

या अधिवेशनास अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष कॉम्रेड किसन गुजर, कॉम्रेड एम एच शेख (महासचिव सीआयटीयु) यांनी मार्गदर्शन केले. तर जनवादी महिला संघटनेच्या राज्याध्यक्ष कॉ नसिमा शेख व एस एफ आयचे जिल्हा अध्यक्ष अतुल फसाले यांनी शुभेच्छा दिल्या.

अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणुन कंदलगावचे ज्येष्ठ शेतकरी आनंदराव कोल्हे हे होते.प्रारंभी कंदलगावचे सरपंच रावसाहेब पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अधिवेशनाची सुरुवात करण्यात आली. 

अधिवेशनाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष डॉक्टर शिवानंद झळके यांनी केले तर आभार जिल्हा सचिव सुलेमान शेख यांनी मानले. 

या अधिवेशनास दक्षिण सोलापूर चे तालुका अध्यक्ष जावेद आवटे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ जोकारे, तुकाराम शेतसंदी, शिवराज कोरे, प्रकाश पाटील, धोंडाप्पा कोले, संतोष कोले, प्रमोद झळके, अब्दुल रजाक मकानदार, यासीन मकानदार, पैगंबर नदाफ, सिंकदर मकानदार यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.