सोलापूर : - सोलापूर जिल्ह्याने कोरोना काळात टीम वर्क आणि सातत्यपूर्ण काम केल्याने माताबाल आरोग्य, नियमित लसीकरण आणि कुटुंब नियोजनामध्ये 88 गुण घेत राज्यात प्रथम क्रमांक पटकविला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शीतलकुमार जाधव यांनी दिली.

आरोग्य व्यवस्थापन व माहिती पध्दती अंतर्गत कुटूंब कल्याण, माताबाल संगोपन व लसीकरण यामध्ये जून २०२२ अखेर झालेल्या कामाचा जिल्हा व महानगरपालिकानिहाय अहवाल आरोग्य विभागाने प्रसिद्ध केला आहे. महापालिकेमध्ये 88गुण घेऊन कोल्हापूर पहिला आला आहे.

प्रत्येक शासकीय मोहिमेला राज्यस्तरावर 25 टक्केपेक्षा जास्त काम होणे अपेक्षित होते. यामध्ये गरोदर मातांची नोंदणी, तपासणी, लसीकरण, बालकांच्या जन्माची नोंदणी, लसीकरण, कुटुंब नियोजन यामध्ये अपेक्षित काम करण्यात सोलापूर जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकवला. 

त्यानुसार सर्व जिल्हे व मनपा यांचा गुणानुक्रम अहवाल तयार करण्यात आलेला आहे. अतिरिक्त संचालक राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे यांनी हा अहवाल आज 22 ऑगस्टला प्रसिद्ध केला. सिंधुदुर्ग, अमरावती, अकोला, वर्धा आणि कोल्हापूर जिल्हा यांना अपेक्षित टार्गेट पूर्ण करता आले नाही.

*योग्य नियोजन, वेळेत बैठका यामुळे टार्गेट पूर्ण-डॉ जाधव*

जिल्ह्यामध्ये माताबाल आरोग्य, नियमित लसीकरण आणि कुटुंब नियोजनामध्ये चांगले काम झाले आहे. यासाठी कोरोना काळात योग्य नियोजन केले होते. कोरोना लसीकरणासोबत नियमित लसीकरण घेण्याच्या सूचना वेळोवेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. ऑनलाईन बैठका घेऊन दिलेले टार्गेट पूर्ण करण्याच्या दिलेल्या सूचना कामी आल्या आहेत. हे काम माता बालसंगोपन अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी यांनी चांगल्या पद्धतीने केले असल्यामुळे यश मिळाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ जाधव यांनी सांगितले.