रमेश घनाते,चंद्रकांत कटारे व स्नेहल अंबरकर सन्मानित
सोलापूर - भावसार व्हिजन सोलापूर क्लबचा १६ वा वर्धापन दिन व सेवा गौरव पुरस्कार सोहळा हॉटेल साईप्रसाद येथे राष्ट्रीय सचिव सिद्धू माळदकर (बेळगाव) व समाज अध्यक्ष श्री गोविंदराव हिबारे यांच्या उपस्थित थाटात संपन्न झाला. यावेळी चंद्रकांत कटारे,रमेश घनाते व स्नेहल अंबरकर यांना सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी समाज अध्यक्ष गोविंदराव हिबारे, एरिया गव्हर्नर गिरीष पुकाळे, नॅशनल डायरेक्टर शिवाजी उपरे , अध्यक्ष श्रीराज निकते, व सचिव मल्लिनाथ बासूतकर व्यासपीठावर उपस्थित होते.
सोहळ्याची सुरुवात गायत्री मंत्राने करण्यात आली त्यानंतर समाजातील दिवनगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली.
अध्यक्ष श्रीराज निकते यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. सचिव मल्लिनाथ बासूतकर यांनी मागील महिन्यातील व्हिजनच्या कार्याचा आढावा घेतला.
दरवर्षी भावसार व्हिजनच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रातील प्रदीर्घ सेवा बजावलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींना सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते, यंदाच्या वर्षी रेडिमेड उद्योग क्षेत्रातील ५० वर्षाहून अधिक सचोटीने व्यवसाय केलेल्या रमेश घनाते यांचा तर केटरिंग व्यवसायातील प्रदीर्घ सेवेबद्दल चंद्रकांत कटारे व भावसार समाजातील पहिली महिला लोको पायलट असलेल्या स्नेहल अंबरकर हिचा हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात गिरीष पुकाळे यांनी प्रमुख पाहुणे सिद्धू माळदकर यांचा परिचय करून दिला तर विशाल खमीतकर यांनी सत्कारमूर्ती रमेश घनाते यांचा तर संतोष पुकाळे यांनी चंद्रकांत कटारे यांचा तर शिवाजी उपरे यांनी स्नेहल अंबरकर हिचा परिचय करून दिला. सन्मानपत्र, शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन तिघांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे सिद्धू माळदकर यांनी भावसार व्हिजनच्या सेवा पुरस्काराने मान्यवरांच्या कार्याची ओळख झाली असून हा पुरस्कार त्यांना पुढे कायम उत्कृष्ट कार्य करण्याची नक्कीच प्रेरणा देईल व समाजासमोर एक उत्तम आदर्श निर्माण करेल असे सांगितले व या पुरस्कारासाठी योग्य व्यक्तींची निवड केल्याबद्दल व्हिजनचे कौतुक केले. समाज अध्यक्ष गोविंदराव हिबारे यांनी भावसार व्हिजनचे सोलापुरातील कार्य हे दीपस्तंभासारखे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणिता महिंद्रकर यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन मल्लिनाथ बासूतकर यांनी केले.