शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या

परभणी/प्रतिनिधी

तालुक्यातील पेडगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेतील शिक्षकांच्या रिक्त असलेल्या जागा भरून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे व इतर सोयीसुविधा पुरवाव्यात या प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आज सोमवारी (दि.22) जिल्हाधिकारी कार्यालय गाठून थेट प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी आंदोलन करीत पालक, विद्यार्थी व गावकरी यांच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, पेडगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेत मुख्याध्यापक वर्ग 2, विज्ञान विषय शिक्षकांचे पद त्वरीत भरावे. विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप झालेले नाही याची चौकशी करावी. शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. शाळेस भेट प्रत्यक्ष समस्यांची पाहणी करावी. आठ दिवसात निर्णय घेऊन ठोस कार्यवाही करावी अन्यथा गावकरी , पालक व विद्यार्थ्यांच्या वतीने पेडगाव फाटा या ठिकाणी तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. नवीन इमारतीचे काम 2 वर्षापासून अपूर्ण असून चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी. शाळेमध्ये महिला कर्मचारी व विद्यार्थीनीसाठी शौचालय उपलब्ध करून देण्यासाठीच्या सुचना संबंधित विभागाला कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर 

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख,गोपाळ देशमुख , दिपक देशमुख, बाळासाहेब देशमुख, माऊली टाकळकर,बाळू पैठणे, शेख सलमान, हनुमान देशमुख,आशिष हारकळ, शेख रसुल भाई आदींच्या सह्या आहेत.