*गुऱ्हाळे येथे सेंद्रिय शेती मार्गदर्शन शिबिर संपन्न*
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रमाचे औचित्य साधुन कृषि विभागामार्फत गुऱ्हाळे येथे सिद्धार्थ केदारे यांच्या प्रक्षेत्रावर सेंद्रिय शेती मार्गदर्शन व शेतकरी मेळावा संपन्न झाला.सदर कार्यक्रमाप्रसंगी सेंद्रिय शेती तज्ञ सिद्धार्थ केदारे, कृषी तज्ञ डॉ. रामनाथ जगताप,हवामान तज्ञ दिपक जाधव या प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केले.सिद्धार्थ केदारे यांनी त्यांच्या प्रक्षेत्रावर उपस्थित शेतकरी बांधवांची शिवार फेरी घडवून वापरत असलेले तंत्रज्ञान व प्रत्येक प्लॉटमधील फळ पिके ड्रॅगन फ्रुट,पेरू, सिताफळ, काजू,चिंच आदींचे उत्पादन तंत्रज्ञान याबाबत सविस्तर माहिती दिली.तसेच उपस्थित शेतकरी बांधवांना शाश्वत शेती करण्याबाबत व सेंद्रिय शेतीचा अंगीकार करण्याबाबत आवाहन केले.तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे यांनी सेंद्रिय शेतीचे महत्व विशद केले. डॉ.रामनाथ जगताप यांनी विषमुक्त शेती व जमिनीचे आरोग्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच उपस्थित शेतकरी बांधवांना रासायनिक खते,कीटकनाशके,बुरशीनाशके यांपासून मानवी आरोग्यावर व जमिनीवर होणारे दुष्परिणाम व जैविक जिवाणू संवर्धके यांचे महत्त्व विशद केले.जोपुळ येथील पर्यावरण तज्ञ दिपक जाधव यांनी पुढील पंधरा दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज सांगून पाऊस कसा असेल व शेतकरी बांधवांनी या काळात पिकांची काय काळजी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रम प्रसंगी परिसरातील शेतकरी बांधव,मंडळ कृषी अधिकारी अनिल मोकळ,अमित भोसले तसेच कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी सहाय्यक चंद्रकला पगार यांनी विशेष परिश्रम घेतले व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.