औरंगाबाद (प्रतिनिधी) ऑगस्ट : माणूस हा पाण्याचा बुडबुडा आहे, असं म्हणतात. आपल्यासोबत कधी काय होईल, याचा काहीच भरोसा नाही. त्यामुळे आपण आयुष्य जगताना सर्वांशी चांगलं पाहिजे. मधूर बोललं पाहिजे. गरजूला मदत केली पाहिजे. कारण आपण या जगात जेव्हा नसू तेव्हा हे जग आपलं नाव काढेल, किंवा जगाला आपलं स्मरण होईल, असं म्हणतात.

त्यामुळे माणसाने माणुसकी कधीच सोडू नये. पण औरंगाबाद शहारात माणुसकीला काळीमा फासणारी अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे आज माणुसकी शिल्लक राहिलेली आहे की नाही? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.अतिशय लाजीरवाणी अशी ही घटना आहे. औरंगाबाद सिडको बस स्टँडच्या बाजूला मुख्य रस्त्यावर एका महिलेचा अचानक मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत्यू होण्याच्या अगोदर या महिलेने अनेक जणांना आपला त्रास सांगितला. मात्र कोणीही याकडे लक्ष दिले नाही.

अखेर महिलेचा तडफडून रस्त्यावरच मृत्यू झाला. त्यानंतर अर्धा तास ना रुग्णवाहिका होती, ना पोलीस, त्यानंतर रुग्णवाहिका बोलावली गेली. मात्र रुग्णवाहिकेनेदेखील महिलेचा मृतदेह घेण्यास नकार दिला. विशेष म्हणजे अजून देखील हा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला आहे.

घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमलेली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, महिलेच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. महिलेने मदतीसाठी इतक्या याचना केल्या तरी कुणीही त्यांना मदत केली नाही म्हणून सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

या महिलेला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला की आणखी दुसरं काय घडलं? हे अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेवर पोलीस आणि आरोग्य प्रशासन नेमकं काय उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण महिला जेव्हा मदतीसाठी याचना करत होती तेव्हा तिला तातडीने रुग्णालयात नेले असते तर कदाचित महिलेचा जीव वाचला असता, अशी चर्चा परिसरात सुरु आहे.