बीड (प्रतिनिधी) - शहरातील चांदणी चौक ते शहिंशाहवली दर्गा पर्यंतचा रस्ता काही महिन्यांपूर्वी सिमेंट काँक्रीटने बनविण्यात आला. परंतु याच रस्त्यावर असलेल्या मोठ्या नाल्यावरील पूल बनविण्यात आले नसल्याने पुलाच्या दोन्ही बाजूस रस्ता उंच झाला आहे व पूल खाली गेल्याने वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून या रस्त्यावरील पुलाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा. अशी मागणी मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, अनेक वर्षांपासून रखडत पडलेला चांदणी चौक ते शहिंशाहवली दर्गा पर्यंतचा रस्ता अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर काही महिन्यांपूर्वी एकदाचा बनविण्यात आला खरा परंतु याच रस्त्यावर असलेल्या मोठ्या नाल्यावरील पुलाला न बनविता तसेच सोडून देण्यात आले. यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला झालेले नवीन कॉंक्रिटीकरण वर झाले असून पुल दोन्ही बाजूच्या रस्त्याच्या खाली झाले आहे. यामुळे दुचाकी व तीन चाकी वाहन चालविताना वाहन चालकांना मोठा त्रास तर होतच आहे शिवाय वाहनांची नासधूस ही होत आहे. पुलावर फक्त दगड, खडी आणि चिखल पडलेले आहे. सदरील जुने पूल तोडून येथे नवीन उंच व रुंद पूल निर्माण करण्याची गरज आहे. या रस्त्यावर असलेल्या ऐतिहासिक शहिंशाहवली दर्गात दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने सर्व धर्मीय भाविक येतात. शिवाय शहरात असलेल्या मोठ्या कब्रस्तानांपैकी शहिंशाहवली दर्गाचेही एक मोठे कब्रस्तान आहे. येथे येणाऱ्यांना तसेच मयत दफ़न करण्यासाठी घेऊन जाताना सुद्धा या पुलामुळे फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी याकडे विशेष लक्ष देऊन अल्पावधीतच बीड शहरवासीयांच्या मनात एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून स्थान मिळविलेले बीड नगरपरिषद चे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी हा पूल उंच व रुंद करण्याचा प्रश्न मार्गी लावून पुल लवकरात लवकर तयार करून जनसेवेत द्यावा व नागरिकांसह शहिंशाहवली दर्गा मध्ये येणाऱ्या भाविक भक्तांची त्रासातून सुटका करावी. अशी मागणी मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.