पुण्याकडे जाण्यासाठी ट्रॅव्हल्सची वाट पाहत उभ्या असलेल्या २१ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग करीत पाच जणांनी तिच्या सोबत असलेल्या दोघा भावांना लोखंडी पट्टी व दगडाने मारहाण केली. त्या नंतर ट्रॅव्हल्स मधून आलेल्या पतीस ही लाथा बुक्याने मारहाण केल्याची घटना केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे येथील २१ वर्षीय विवाहित महिला ही माहेरी केज तालुक्यातील एका गावात आली होती. ती परत पुण्याकडे जाण्यासाठी १७ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता मांजरसुंबा रस्त्यावरील एका फाट्यावर थांबली होती. तिच्या सोबत तिचे दोन भाऊ उभे होते. तर तिचा पती हा केज येथून ट्रॅव्हल्समध्ये जागा बुक येत होता. याच वेळी हनुमंत ज्ञानोबा मुंडे ( रा. मुंडेवाडी ता. केज ), बाबुराव आप्पाराव ढाकणे, पंढरी अशोक ढाकणे ( दोघे रा. सारूळ ता. केज ) व इतर अनोळखी असे पाच जण तिथे आले. त्यांनी या महिलेस पाहून अश्लील बोलत तिचा विनयभंग केला. तिच्या भावांनी सोडविण्याचा प्रयत्न केला असता एका भावास लोखंडी पट्टी डोक्यात मारून डोके फोडले. तर दुसऱ्या भावास पाठीत दगडाने मारहाण करून मुक्कामार दिला. या वेळी तिचा पती ट्रॅव्हल्समधून आला असता तिच्या पतीला ट्रॅव्हल्समधून खाली ओढून या पाच जणांनी लाथाबुक्याने मारहाण केली. अशी फिर्याद पीडित महिलेने दिल्यावरून हनुमंत मुंडे, बाबुराव ढाकणे, पंढरी ढाकणे व इतर अनोळखी दोघे अशा पाच जणां विरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनात जमादार अभिमान भालेराव हे पुढील तपास करत आहेत.