कन्नड शहरात 'श्रीराम जय राम जय जय राम'च्या गजरात श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच विविध मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. कीर्तन, पाळणा सोहळा आणि त्यानंतर मिरवणुका अशा भक्तिमय वातावरणात गुरुवारी (दि. २६) मार्च रोजी विवेकानंद कॉलनी, सरस्वती कॉलनी, हिवरखेडा गौताळा, ब्राह्मण गल्ली आदी भागातील मंदिरांमध्ये श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

​यावेळी रामजन्म सोहळ्यानिमित्त संगीत कार्यक्रम, शोभायात्रा तसेच सामुदायिक रामरक्षा पठण यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'सिया रामचंद्र की जय', 'प्रभू रामचंद्र की जय' आणि 'बोल बजरंगबली की जय' अशा घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांनी उधळलेल्या गुलालामुळे मंदिर परिसरात रंगांची उधळण झाली असून संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारावून गेले होते.

​शहरात स्वराज्य रक्षक संघाची भव्य शोभायात्रा

​शहरातील स्वराज्य रक्षक संघाच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव निमित्त भारुका नगर येथील गिरणी ग्राउंडवरून सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. भगवे ध्वज हातात घेऊन श्रीराम भक्तांनी उत्साहात जयघोष केला. शोभायात्रेमुळे शहरात सर्वत्र भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते.

​प्रभू श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी मंदिर परिसर अक्षरशः भाविकांनी फुलून गेला होता. मध्यरात्रीपासून मंदिरांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर सकाळी सहा वाजता मंदिरांचे दरवाजे दर्शनासाठी खुले करण्यात आले. दर्शनानंतर काही ठिकाणी भाविकांनी महाप्रसादाचाही लाभ घेतला.