माजी आमदार स्वर्गीय विनायकराव मेटेंच्या अपघाताची सीआयडी चौकशी होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर विनायकराव मेटेंचे १४ ऑगस्टला अपघाती निधन झाले होते.शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मोटार अपघातात मृत्यू झाला.शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाताची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालकांना मुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्देश दिले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर विनायक मेटेंचे १४ ऑगस्टला अपघाती निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूबाबत घातपाताची शंका उपस्थित करण्यात आल्यानंतर शिंदे सरकारकडून सीआयडी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
या अपघातावेळी मेटेंसोबत प्रवास करत असलेले दोघे जण बचावले आहेत. दरम्यान, मेटेंच्या गाडी चालकाची देखील कसून चौकशी करण्यात आली आहे. विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती यांनी चालकासंदर्भात बोलताना केलेलं विधान प्रकरणात गूढ वाढवणारं आहे. चालक अपघाताचं ठिकाण सांगत नव्हता असं ज्योती यांनी म्हटलं आहे. सत्य लपवण्याचा प्रयत्न होतोय असं वाटतं असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.