इतरांबरोबर बोलल्याचे समजल्याने मित्राने मारहाण करून पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये नाक तोंड बुडवून महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी शुभम संभाजी पाटील (वय ३०, रा. बकोरी) याच्यावर खूनाचा प्रयत्न, बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी एका २९ वर्षाच्या महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २१ जून १३ ऑगस्ट २०२२ दरम्यान घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व तिचे पती यांच्या कौटुंबिक वाद असल्याने त्या मागील ६ महिन्यांपासून वेगळे राहतात. शुभम पाटील हा त्यांचा मित्र आहे. त्याने फिर्यादी यांच्याबरोबर जबरदस्तीने वारंवार शारीरीक संबंध ठेवून त्यांना गर्भवती केले आहे. फिर्यादी व फिर्यादीचे मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. शनिवारी दुपारी तो त्यांच्या घरी आला होता. त्यावेळी फिर्यादी यांच्या मोबाईलमध्ये दोघा जणांशी बोलल्याचे त्याला आढळून आले. त्याचा राग मनात धरुन त्याने फिर्यादीस घरातील बाथरुममध्ये असलेल्या पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये दहा मिनिटे नाक तोंड बुडवून ठेवले. फिर्यादीस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी स्वत: ची कशीबशी सुटका करुन घेतली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली असून लोणीकंद पोलीस तपास करीत आहेत.