मुंबई ,१७ ऑगस्ट  (दीपक परेराव) :-देशपातळीवर गेल्या वर्षभरापासून आपण स्वांतत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. पतंप्रधानांनी हर घऱ तिरंगा हे अभियान राबवले होते याला चांगला प्रतिसाद देशभरातून मिळाला होता. त्याचाच भाग म्हणून आता राज्य सरकारने सामुहिक राष्ट्रगीत गायनाचे आवाहन केले आहे. यासाठी सरकारी परिपत्रकच काढण्यात आले आहे.

बुधवारी सकाळी ११ वाजता राज्यात सामूहिकपणे राष्ट्रगीताचे गायन होणार असून नागरिक ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभे राहून त्यांनी यामध्ये भाग घ्यावा याबाबतचा जीआर देखील काढण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील शासकीय, खासगी तसेच इतर सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये स्थानिक शिक्षण संस्था, विद्यापीठातील शिक्षक विद्यार्थी यामध्ये सहभागी होतील. खासगी अस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने यांनीही यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन सरकारने केले आहे. याबाबतचा जीआर देखील काढण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय म्हणाले की, देशभक्ती, देशप्रेम आणि आपली उज्वल परंपरा जपण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आपण राबवत आहोत. नागरिकांच्या मनात आपला राष्ट्रध्वज आणि आपले राष्ट्रगीत याविषयी पवित्र भावना आहेच, त्याच पवित्र भावनेला सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून जगाच्या समोर आणण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केलेले आहे.चला सारेजण राष्ट्रगीत गाऊया – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, राज्यात दि. १७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११:०० ते ११:०१ या कालावधीत नियोजित सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होऊन एक विक्रम प्रस्थापित करावा, असे आवाहन  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात सध्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत वेगवेगळे अभिनव उपक्रम संपन्न होत आहेत. राज्यातही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन सुरू असून, या महोत्सवाअंतर्गतच, ‘सामूहिक राष्ट्रगीत गायन’ ही अभिनव संकल्पना पुढे आलेली आहे. राज्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहात या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले आहे.

नागरिकांच्या मनात आपल्या राष्ट्रगीताविषयी असणारी पवित्र भावना सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून एका अनोख्या विक्रमाद्वारे साऱ्या जगासमोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या उपक्रमाला मूर्त स्वरूप देण्यासाठी लहान-थोर, स्त्री-पुरुष असा कोणताही भेद न ठेवता  सर्वांनी या उपक्रमात सहभाग घेणे अपेक्षित आहे. नागरिकांनी ज्या ठिकाणी असतील, त्या ठिकाणी राष्ट्रगीताचा सन्मान ठेवून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी  केले आहे.