शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शासनाने ३१ ऑगस्ट हा दिवस विमुक्त दिन म्हणून घोषित करावा व विमुक्त दिनाच्या निमित्ताने १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट हा पंधरवडा राज्यभर भटके विमुक्त पंधरवडा म्हणून साजरा करावा अशी मागणी शिरुर येथील संवाद यात्रेत करण्यात आली . भटके विमुक्त दिनानिमित्ताने भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र राज्य आयोजित संवाद यात्रेचे  शिरूर येथे मोठ्या उत्सहात स्वागत करण्यात आले . या यात्रेच्या निमित्ताने संवाद मेळाव्याचे शिरुर नगरपरिषद मंगल कार्यालय येथे आयोजन  करण्यात आले  होते . ७२ व्या विमुक्त दिनानिमित्त भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने भटके विमुक्त आदिवासींच्या हक्कांसाठी राज्यव्यापी संवाद यात्रेची  घोषणा दिनांक २८ऑगस्ट रोजी पुणे येथील महात्मा फुले यांच्या वाड्यात करण्यात आली. त्यानंतर ३१ ऑगस्ट पासून ही यात्रा सोलापूर येथून निघाली असून ही यात्रा १८ जिल्ह्यातील ३० तालुक्यातून २३ संप्टेंबर रोजी मुंबई येथे पोहचणार आहे . नगरपालिका मंगल कार्यालयातील मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून पुण्याच्या उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे , प्रसिध्द दिग्दर्शक राजकुमार तागडे शाहीर शितल साठे , सचिन माळी , क्रांती संघटनेच्या सुनीता भोसले , मदारी समाजाचे चिराग मदारी ,मुमताज शेख , भावना वाघमारे , अरुण जाधव , ललिता घनवडे , बाबूसिंग पवार , युवराज गटकळ , शरद गोसावी , लोकजागृती संघटनेचे अध्यक्ष रवींद्र धनक , डॉ . सुभाष गवारी ,आदिशक्ती महिला संघटनेच्या शशिकला काळे , माजी नगरसेविका रेश्मा लोखंडे , मंगेश खांडरे ,आखिल भारतीय मराठा महासंघाच्या शोभना पाचंगे , मीना गवारे , राणीताई कर्डिले , सारिका वीरशैव ,रेश्मा शेख , वैशाली ठुबे , भूमीपुत्र संघटनेचे सुशांत कुटे , सागर नरवडे , विशाल जोगदंड , अनिल कांबळे , सविता बोरुडे , अनिल तुलसे , माजी सरपंच वर्षा काळे , प्रियंका धोत्रे आदी उपस्थित होते . संवाद यात्रेचा माध्यमातून खालील मागण्या करण्यात आल्या . भटके विमुक्त, आदिवासी यांचे गायरान, गावठाण, वनजमीन व इतर निवासी व उपजिवीका अतिक्रमणांचे नियमितीकरण करण्यात यावे. न्या. अशोक अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शासन निर्णयानुसार १४ विमुक्त व २८ भटक्या जमातींचा सर्वकष अभ्यास करून केंद्रशासनाकडे केलेल्या अनुसूचित जाती – जमाती मध्ये समाविष्ट करण्याबाबत केंद्र सरकारला सादर केलेल्या शिफारसीनुसार तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. व केंद्रीय पातळीवर सर्व भटके विमुक्त समुहाचे एकत्रीकरण करावे. भटके विमुक्त कल्याणासाठी पर्याप्त बजेट असावे. व आदिवासींसाठी बजेटचा कायदा करण्यात यावा. बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर भटक्या विमुक्ताच्या कल्याणासाठी विचाराधीन असणाऱ्या वनार्ती (वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था) तात्काळ कार्यान्वित करावे. अनुसूचित जाती, जमाती यांच्यावरील होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी प्रतिबंध घालण्यासाठी असणाऱ्या कायद्यामध्ये (ATROCITY act) मुळ भटके, विमुक्त जातीचा समावेश करून त्यांना संरक्षणकवच मिळावे. भटके, विमुक्त जमातीचे पारंपारिक व्यवसाय जसे कि, कटलरी विकणे, भंगार गोळा करणे आदी कामासाठी त्यांना परवाने व ओळखपत्र शासकीय स्तरावरून मिळावे. भटक्या, विमुक्त जमातीतील मुलांना बालवाडी ते पदवीत्तरपर्यंतचे शिक्षण मोफत मिळावे. या समुहातील विद्यार्थ्यांना स्वतंत्र वसतिगृहे असावीत. भटके विमुक्त, आदिवासी मुलांच्या मातृभाषेचा वापर करून शिक्षण देणे, भटके विमुक्त आदिवासी समुदायातील युवक-युवतींना छात्रवृत्ती देऊन उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे. राज्याच्या सर्व विद्यापीठांमध्ये 'विमुक्त जाती व भटक्या जमातीं अध्यासन व संशोधन केंद्र' स्थापन करणे, नागरिकत्व पुरावे मिळविण्यासाठी एक खिडकी पद्धत असावी.महाराष्ट्र शासनांनी भटके विमुक्त आदिवासी समाजाचे नागरिकत्व पुराव्यांचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनास नागरिकत्व पुरावे काढून देण्याच्या अनुषंगाने दर दोन महिन्यांनी शिबीर / मेळावा आयोजित करून हा प्रश्न मार्गी लावावा.भटके विमुक्त, आदिवासी समाजाच्या योगदानाला मान्यता देणे आणि त्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी 31-ऑगस्ट हे 'विमुक्त दिन' म्हणून घोषित करण्यात यावे. विमुक्त दिनाच्या निमित्ताने १६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या पंधरवड्यात राज्यभर 'भटके विमुक्त पंधरवडा' म्हणून साजरा करण्यात यावे. समाजाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी या पंधरवड्यात "शासन भटके विमुक्त्यांच्या दारी" ही संकल्पना राबविणे, यामुळे समाजाच्या समस्यांवर चर्चा होईल आणि त्यांच्या विकासासाठी उपाययोजना करण्यास शासनाला मदत होईल. या घटकांप्रती प्रशासनास संवेदनशील करणे. महाराष्ट्र शासनने जिल्हा प्रसाशनसह सर्व ग्रामपंचायतींना आदेश द्यावे कि त्यांनी प्रत्येक जिल्हा आणि ग्रामपंचायतीच्या स्तरावर 'भटके विमुक्त आदिवासी विकास आराखडा तयार करावा. या आराखड्यात भटके विमुक्त आणि आदिवासी समाजातील नागरिकांना जागा, घर, शिक्षण, आरोग्य, मनरेगा योजनेद्वारे रोजगार आणि वस्तीत पायाभूत सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्याबाबतचे स्पष्ट नियोजन करावे.भटके विमुक्त जमातीतील धनगर, रामोशी व वडार या स्वतंत्र जमातीसाठी असणाऱ्या महामंडळाचा लाभ सर्व भटके विमुक्त जमातीला देण्यात यावा अश्या मागण्या संवाद यात्रेत करण्यात आल्या आहेत . यावेळी शाहिर शितल साठे व सचिन माळी यांनी सादर केलेल्या ' भटक्यांना पाहिजे आजादी ' हे गीत सादर केले . त्याच बरोबर हनिफ मदारी व हुसेन मदारी ,प्रिया सातपुते यांनी ही गाणी सादर केली . कार्यक्रमाच्या सुरुवातीस बाजार समितीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व आंबेडकर उद्यानातील भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले . यावेळी उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे म्हणाल्या की दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम अनेक समाजसुधारकांनी केले . आदिवासी बांधवान साठी रेशन कार्ड , जातीचे दाखले , मतदार ओळखपत्र व विविध शासकीय कागदपत्रे मिळवून देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी शिबीरे घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले . विविध शासकीय योजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले . यावेळी ॲड .अरुण जाधव , चिराग मदारी यांचे ही भाषणे झाली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक वात्सल्य सिंधु फाउंडैशनच्या उषा शैलेंद्र वाखारे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ . वैशाली साखरे व सुनंदा लंघे यांनी केले .