शिरुर दिनांक ( वार्ताहर ) आगामी विधानसभा निवडणूकीसाठी आपण सज्ज असून राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने निवडणूकीसाठी दावेदार असल्याचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते व घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादापाटील फराटे यांनी सांगितले . शिरुर येथे पत्रकारांशी ते बोलत होते . फराटे म्हणाले की मी राष्ट्रवादी कॉग्रेस कडे उमेदवारी मागितली असुन उमेदवारी न मिळाल्यास महायुतीकडून जो उमेदवार असेल त्याचा प्रचार करणार असल्याचे फराटे यांनी सांगितले . आपण विधानसभेच्या उमेदवारी करीता प्रबळ दावेदार असून पूर्ण तयारीने उतरणार असल्याचे फराटे म्हणाले . दादापाटील फराटे हे तालुक्यतील महत्वाचे नेते असून घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे . त्याच बरोबर राष्ट्रवादी कॉग्रेस व भाजपाचे तालुकाध्यक्ष म्हणून ही त्यांनी काम केलेले आहे . भाजपा मध्ये असताना ते माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात. बाजार समितीचे संचालक म्हणून ही त्यांनी काम केलेले असून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या संचालकपदाची ही निवडणूक त्यांनी लढविली होती . त्याच बरोबर त्यांचे चुलते मल्हारराव फराटे हे पुणे जिल्हा दूध संघाचे व जिल्हा बॅकेंचे संचालक म्हणुन त्यांनी काम केलेले असून मांडवगण फराटा विकास सोसायटीचे चेअरमन व ग्रामसदस्य म्हणून ही त्यांनी काम केलेले आहे . ग्रामीण भागातील कार्यकर्त्याशी थेट संबंध , नातेवाईकांच्या मोठा गोतावळा व प्रामाणिक नेतृत्व या फराटे यांच्या जमेचा बाजू असून लढवय्या व संघर्ष करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे . त्यांच्या सूनबाई समीक्षा फराटे या पूर्व भागातील महत्वाची मानली जाणा-या मांडवगण फराटा ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत . राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये असताना ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते . माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या निधनानंतर बदलेलेली राजकिय परिस्थिती ,राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये झालेल्या घडामोडी नंतर दादापाटील फराटे यांनी पुन्हा राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले आहे . सहकार व साखरकारखानदारी मधील त्यांच्या अनुभव व अभ्यासामुळे ते घोडगंगा साखर कारखान्याचे अध्यक्षपदाचे सातत्याने प्रबळ दावेदार राहीले मात्र त्यांना अध्यक्षपदाने हुलकावणी दिली . अध्यक्षपदाने हुलाकावणी दिल्यावर आता विधानसभेची उमेदवारी मिळवून ते विजयी होवून विधानसभेत पोहचणार का याबाबत उत्सुकता आहे .