औरंगाबाद:- (दीपक परेराव )भारत सरकारने सन 2025 पर्यंत देशाला क्षयरोग मुक्त करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवले आहे. त्या अनुषंगाने शासन क्षयरुग्णांना वेगवेगळया पद्धतीने मदत देऊन त्यांना औषधोपचार मिळवून देत आहे. उपचारावर असणाऱ्या क्षयरुग्णांना शासनामार्फत प्रत्येक महिन्याला निक्षय पोषण योजनेअंतर्गत 500 रुपयाची मदत थेट बँक खात्यामध्ये दिली जात आहे. परंतू या व्यतिरिक्त् क्षयरुग्णांना अतिरिक्त मदत देण्यासाठी केंद्र शासनामार्फत क्षयरोग मुक्त भारत अभियान हा उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमांतर्गत क्षयरुग्णांना अतिरिक्त पोषण आहार, डायग्नोस्टिक मदत, व्होकेशनल मदत या स्वरुपातील मदत उद्योगसमुह, सामाजिक संस्था व दानशूर यांनी करावी असे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.ही
मदत उपचार सुरू असणाऱ्या क्षयरुग्णांना किमान 1 वर्षासाठी प्राधान्याने अतिरिक्त पोषण आहार तसेच डायग्नोस्टिक मदत, व्होकेशनल मदत व इतर आवश्यक मदत स्वरूपात उद्योग समूह, स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्ती इत्यादींच्या माध्यामातून उपलब्ध करून दयावयाची आहे. केंद्र शासनाच्या या महत्वाकांक्षी उपक्रमास सहकार्य करण्यास इच्छुक असलेले उद्योग समूह, स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्ती यांनी जिल्हा क्षारोग अधिकारी औरंगाबाद मुख्यालय अथवा dtomhabd@rntcp.org या ई-मेल आयडीव्दारे “निक्षय मित्र” म्हणून संपर्क साधावा आणि राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाला सहकार्य करुन एकजुटीने हातभार लावावा असे आवाहन मा जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्या वतीने करण्यात येत आहे.