14 ऑगस्ट रोजी “फाळणी दु:खद स्मृती दिना”चे आयोजन
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रदर्शन, रॅली व विविध कार्यक्रमांचे आयोजन
गडचिरोली, दि.13: उद्या दि.14 ऑगस्ट रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे सकाळी 10.00 वा. “फाळणी दु:खद स्मृती दिना”चे आयोजन करण्यात येणार आहे. देशात 14 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या फाळणी दरम्यान हजारो लोकांना ज्या यातना झाल्या, मनस्ताप आणि दु:ख भोगावे लागले त्याची कल्पना यावी यादृष्टीने हा दिवस संपुर्ण देशात आयोजित करण्यात येणार आहे. विभाजनावेळी घडलेल्या विविध घटनांची आठवण करून देणाऱ्या चित्ररूपी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी विभाजनादरम्यान गडचिरोली जिल्हयात स्थायिक झालेले नागरिकांना त्यांचे विचार मांडण्यासाठी व त्यांना या स्मृती दिनानिमित्त अनुभव मांडण्यासाठी बोलविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दिली आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते.
जिल्हयातील स्वातंत्र सेनानी, जेष्ठ नागरिक, लोक प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत. देशभक्तिपर गीत यावेळी प्रदर्शन ठिकाणी वाजविण्यात येणार आहेत. नियोजन भवन गडचिरोली येथे फाळणी वेळी घडलेल्या घडामोडी वर आधारीत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.