कर्जतच्या रथयात्रा कालावधीत खोडसाळपणा कराल तर याद राखा!
दमदाटी करून फुकट खाणे अथवा खेळण्यांचा फुकट लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई..
_पोलीस निरीक्षक यादव यांनी घेतली नियोजन बैठक; रथयात्रेवर राहणार पोलिसांचे विशेष लक्ष_
कर्जतचे ग्रामदैवत संतश्रेष्ठ सद्गुरू गोदड महाराजांच्या रथयात्रेसाठी यंदाही भाविकांची मोठी गर्दी होत आहे. या कालावधीत कसलाही अनुचित प्रकार घडल्यास तसेच कुणीही खोडसाळपणा करण्याचा प्रयत्न केल्यास याद राखा! नाहीतर अशांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा सज्जड दमच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे.
रथयात्रेच्या नियोजनासाठी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आता पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.या यात्रेदरम्यान कोणताच अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्रास देणाऱ्या,धार्मिक तेढ वाढवणाऱ्या इसमांवर कर्जत पोलिसांनी तडीपारीसारख्या प्रतिबंधक कारवायाही केल्या आहेत. कर्जतच्या रथ यात्रेला चार ते पाच दिवसांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर भाविकांची रैलचेल राहते.यानिमित्त नागरिकांच्या मनोरंजनासाठी परगावाहून आलेल्या व्यावसायिकांची खेळणी,विविध दुकाने थाटलेली आहेत.मात्र या दुकानांमधून वस्तू-साहित्य खरेदी करणे,पाळणे-खेळण्यांमध्ये बसने मात्र पैसे न देणे,दमबाजी करणे अशा घटना यापूर्वी अनेकवेळा घडलेल्या आहेत. त्यामुळे अशा फसव्या नागरिकांवर पोलिसांचे लक्ष राहणार असून असे प्रकार निदर्शनास आल्यास अशांवर खंडणीसारखे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. यात्रेदरम्यान वेगवेगळ्या गटांत युवकांमध्ये कोणत्याही कारणावरून वाद होण्याचे प्रकार घडत असतात असे कोणतेही प्रकार निदर्शनास आल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.दरम्यान पोलीस निरीक्षक यादव यांनी रथयात्रेच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.पार्किंग, रस्ते आदींसह अनेकांना नियोजनाबाबत योग्य सूचना दिल्या. तेथे असणाऱ्या सर्व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. 'जर कुणी नाहक त्रास दिला किंवा दमबाजी करून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तर कर्जत पोलिसांशी संपर्क साधण्याचे त्यांनी आवाहन केले.
.....असा प्रकार घडल्यास करा पोलीस ठाण्यात तक्रार !
यात्रेनिमित्त अनेकांनी छोटीमोठी दुकाने,पाळणे,खेळण्यांची दुकाने थाटली आहेत. मात्र कुणी जर त्रास देण्याचा,वाद घालून पैसे बुडवण्याचा, दमदाटी करण्याचा प्रयत्न केला तर व्यापारी व व्यावसायिकांनी तात्काळ कर्जत पोलीस ठाण्यात समक्ष किंवा फोन 02489222333 करून तक्रार करावी.त्रास देणारांची गय केली जाणार नाही.अन्यथा 99 23 630 652 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा.
- चंद्रशेखर यादव,पोलीस निरीक्षक कर्जत