शिरुर :  महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शिरुरच्या कार्याध्यक्षा व चांदमल ताराचंद बोरा महविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रा. डॉ . क्रांती पैठणकर (गोसावी) यांनी लिहिलेल्या 'कहाणी एका सुधारकाच्या सहजीवनाची ' या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ . बाबा आढाव व डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते करण्यात आले . मुस्लीम सत्यशोधक मंडळाचा ५४ वा वर्धापनदिनानिमित्त मुस्लीम सत्यशोधक मंडळ वर्धापनदिन विशेषांक आणि डॉ. क्रांती पैठणकर यांच्या संशोधनावर आधारित "कहाणी एका सुधारकाच्या सहजीवनाची" पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले . यावेळी सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ .शमसुद्दीन तांबोळी , माजी प्राचार्य भाउसाहेब जाधव , प्रा .जहीर अली , ज्योती मोहम्मद ,फिरोज मिठीबोरवाल , मुमताज शेख , सुरेश शिपूरकर , जगदीश काबरे , मोहम्मद वाहीद , , माजी पोलीस आधिकारी अशोक घिवरे ,सत्यशोधक मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. सायरा मुलाणी , कार्यवाहक अल्तापहुसेन नबाब ,खजिनदार दिलावर शेख ,, माजी प्राचार्य डॉ . सिताराम गोसावी , उपप्राचार्या डॉ. .सीमा गोसावी , प्रा. डॉ .राजाभाउ भैलूमे आदी उपस्थित होते . या पुस्तकाविषयी माहिती सांगताना प्रा. डॉ. क्रांती पैठणकर यांनी सांगितले की मराठी साहित्यातील आत्मचरित्रांचे दालन अतिशय समृद्ध आहे, त्यातही स्त्रियांनी केलेले आत्मचरित्रपर लेखन वैशिष्ट्यपूर्ण आहे. मराठी वाङ्ममय प्रकारांचा अभ्यास करताना कविता, कथा, कादंबरी, नाटक यांप्रमाणेच आत्मचरित्र हा वाङ्‌मयप्रकारही वाचनात आला व तो विशेष आवडू लागला. अनेक आत्मचरित्रे वाचनात आली. विशेषतः स्त्रियांनी लिहिलेली ही आत्मचरित्रे वाचत असताना मेहरून्निसा दलवाई यांचे 'मी भरून पावले आहे' हे आत्मचरित्र अधिक भावले. मेहरून्निसा दलवाई या मुस्लीम सत्यशोधक समाजाचे संस्थापक व सुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी. एका मुस्लीम स्त्रीचे मराठीतील पहिलेच आत्मचरित्र म्हणून या आत्मचरित्राला मराठी आत्मचरित्र विश्वात एक मोलाचे स्थान प्राप्त झाले आहे. मेहरून्निसा दलवाई यांचे हे बोलपुस्तक अभ्यासताना वारंवार असे वाटले की, एक फार मोठा सामाजिक दस्तऐवज मेहरून्निसा यांनी वाचकांच्या हाती दिला आहे. अत्यंत संयमितपणे, कोणत्याही प्रकारचा त्रागा न करता, कुणाचेही उणेदुणे न काढता समाजासमोर, वाचकांसमोर मेहरून्निसा यांनी प्रांजळपणे कथन केलेली ही वास्तवदर्शी कहाणी अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही. या आत्मचरित्रामुळे मुस्लीम समाजाकडे पूर्वाश्रमीचा बघण्याचा दृष्टिकोन कसा चुकीचा आहे हे तर उमगतेच, पण तेही पुरोगामी असतात, स्त्रियांच्या प्रश्नांसंबंधी जागरूक असतात, प्रसंगी समाजाशी लढण्यास तयार असतात, याची जाणीव सदर आत्मचरित्रातून होते. सामाजिक चळवळीतले अनुभव, सामाजिक कार्य करीत असताना ज्या काही गोष्टी घडल्या, त्यांचे तपशिलांसह अवलोकन मेहरून्निसा प्रत्येक ठिकाणी करताना दिसतात. या आत्मचरित्रातील ही सामाजिकता महत्त्वाची वाटते असे ही पैठणकर यांनी सांगितले . हमीद दलवाई एक निर्भय व बंडखोर असे समाजसुधारक होते . आपल्या समाजाचा रोष पत्करून त्यांनी सामाजिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः समान नागरी कायद्याचा आग्रह धरला. जबानी तलाक पद्धतीतून मुस्लीम स्त्रियांची मुक्तता व्हावी यासाठी आयुष्यभर चळवळी केल्या. असा हा पुरोगामी विचारसरणीचा सुधारक वैयक्तिक जीवनात कसा आहे ? मेहरून्निसा त्यांच्याविषयी काय म्हणू इच्छितात ? हे जाणून घ्यावेसे वाटले. म्हणूनही या आत्मचरित्राकडे मी वळल्याचे त्यांनी सांगितले . मराठी साहित्यातील स्त्री आत्मचरित्रांच्या प्रवाहात मेहरून्निसा यांनी लिहिलेले हे आत्मचरित्र वेगळे व महत्त्वपूर्ण ठरते. एका समाजबदलाचे संदर्भासहित दाखले देणारे ठरते, हे महत्त्वाचे असून ते समजून घेऊन त्याची अनेक अंगांनी चिकित्सा करण्याचा प्रयत्न या पुस्तकात केल्याचे पैठणकर यांनी सांगितले .