शिरुर दि . ( वार्ताहर ) सन २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत जय मल्हार क्रांती संघटनेला महायुतीत घटकपक्ष म्हणून समाविष्ट करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक व राष्ट्रीय नेते  दौलतनाना शितोळे यांनी सांगितले.

शिरुर येथील पत्रकार परिषदेत शितोळे म्हणाले की जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने सन २०१६ पासून महाराष्ट्रातील रामोशी, बेरड, बेडर समाज एकत्रित करून रामोशी, बेरड, बेडर समाजाच्या न्याय हक्कासाठी विविध आंदोलने, मोर्चे काढून समाजाला न्याय मिळवून देण्यात येत आहे . तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबवून  विधायक कामे करण्यात करत येत  आहे . सन २०१७ मध्ये लाखोच्या संख्येने राज्यभर मोर्चे  काढण्यात आले  .यातील प्रमुख मागणी आद्यक्रांतीवर राजे उमाजी नाईक यांची जयंती शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरी करावी अशी होती. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची शासकीय निमशासकीय कार्यालयाने शासकीय जयंती साजरी करण्याचा जीआर काढला तसेच भिवडी ता. पुरंदर येथील राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकास पाच कोटी निधी जाहीर केला. आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या नावे रामोशी, बेरड समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून त्यास पन्नास कोटी निधी दिला. जय मल्हार क्रांती संघटना ही सन २०१६ पासून भारतीय जनता पार्टी व देवेंद्र  फडणवीस यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. महाराष्ट्र राज्यातील सांगली, हातकलंगले, कोल्हापूर, पुणे, मावळ, बारामती, माढा, सोलापूर, अहील्यानगर, शिर्डी, सातारा, शिरूर, धाराशिव, नाशिक या १४ लोकसभा मतदारसंघांमध्ये रामोशी, बेरड,  समाजाचे निर्णायक मतदान आहे. तसेच महाराष्ट्रातील मिरज, सांगली, खानापूर-आटपाडी, बत्तीस शिराळा, पलूस-कडेगाव, जत, तासगाव- कवठे महाकाळ , इस्लामपूर वाळवा, चंदगड, कागल, चाळीसगाव, करमाळा, कोरेगाव, मान-खटाव, कराड दक्षिण, कराड उत्तर, वाई, खंडाळा फलटण, म्हाडा, माळशिरस, सांगोला, पंढरपूर, अक्कलकोट, इंदापूर, बारामती, पुरंदर, दौंड, शिरूर-हवेली, पारनेर, संगमनेर, सिन्नर, उमरगा, औसा-निलंगा, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड, शिरोळ, या ३७ विधानसभा मतदारसंघांमध्ये रामोशी, बेरड, बेडर समाजाचे निर्णायक मतदान आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ने महाराष्ट्रातील रामोशी, बेरड, बेडर समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य करून गेल्या आम्हाला न्याय दिल्यामुळे सन २०१६ पासून आम्ही भाजप बरोबर आहोतच. आता होवू घातलेल्या २०२४ च्या लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपा प्रणित महायुती घटक पक्षांमध्ये जय मल्हार क्रांती संघटना सामील झाली आहे .भारतीय जनता पार्टी व महायुतीचे लोकसभा व विधानसभेचे सर्व उमेदवार निवडून आणण्याकरिता जय मल्हार क्रांती संघटना प्रामाणिक प्रयत्न करणार आहे, अशी माहिती शितोळे यांनी दिली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका लढविणार असल्याचे ते म्हणाले . महायुतीत  समाविष्ट केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी , भाजपाचे  पक्षाध्यक्ष जे . पी नड्डा , गृहमंत्री अमित शहा ,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजितदादा पवार , यांचे आभार मानले .यावेळी हाजी रुस्तूम सय्यद , दिनेश चव्हाण , आकाश चाकणे  आदी यावेळी उपस्थित होते .